नवी दिल्ली - भारतात तयार होणाऱ्या ॲपल आयफोनचा जगात दबदबा चांगलाच वाढला आहे. जानेवारीत आयफोनच्या निर्यातीने १ ट्रिलियन अर्थात १ लाख कोटी रुपये इतक्या मूल्याचा टप्पा पार केला. चालू आर्थिक वर्षात एप्रिल २०२४ ते जानेवारी २०२५ या कालावधीत आयफोनच्या निर्यातीत तब्बल ३१ टक्के वाढ झाली आहे. मागच्या वर्षी याच समान कालावधीत ७६ हजार कोटींचे आयफोन निर्यात केले होते.
आयफोन १६च्या लाँचनंतर निर्यातीत वेगाने वाढ झाली आहे. हा फोन भारतातही मोठ्या प्रमाणात असेंबल केला जात आहे. याची भारतात निर्मिती सुरू झाल्यापासून आयफोनची निर्यात मूल्यात दर महिन्याला १० हजार कोटींपेक्षा अधिक वाढ झाली आहे. त्यामुळे या आर्थिक वर्षात पहिल्या १० महिन्यांत १ लाख कोटीच्या निर्यातीचा विक्रमी टप्पा गाठणे शक्य झाले आहे.
इलेक्ट्रॉनिक्स निर्यातवाढीचे सरकारचे लक्ष्य
सरकारने इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या सुट्या भागांसाठी नवीन योजना राबवण्याचे संकेत दिले आहेत. २५ हजार कोटींच्या निधीची तरतूद केलेल्या या योजनेला लवकरच मंत्रिमंडळाची मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. मोबाइल निर्मितीत मूल्यवर्धन साधणे आणि देशाला इलेक्ट्रॉनिक्स निर्यातीचे एक प्रमुख केंद्र बनवणे, हा या योजनेमागचा हेतू आहे.
‘पीएमपी’ योजनेमुळे बूस्टर
२०१७ मध्ये सरकारने स्मार्टफोनची आयात कमी करून देशांतर्गत असेंब्लीला चालना देण्यासाठी फेस्ड फेज्ड मॅन्युफॅक्चरिंग प्रोग्राम (पीएमपी) सुरू केला. यामुळे स्मार्टफोन निर्मितीला बळ मिळाले.
निर्यात कशामुळे वाढली?
कंपनीने भारतातील आपली पुरवठा साखळी मजबूत केली आहे. त्यामुळे भारतात असेंबल होणाऱ्या फोनच्या दर्जात कमालीची सुधारणा झाली आहे. २०२० मध्ये मूल्यवर्धन केवळ ५ ते ६ टक्के होते. कंत्राटपद्धतीवरील करारांमुळे हे मूल्यवर्धन १५ ते १६ टक्के वाढले आहे. उत्पादन आधारित प्रोत्साहन अर्थात पीएलआय योजनेमुळे निर्यातीला गती मिळाली आहे. यामुळे कंपनीने आपली पुरवठा साखळी चीनमधून भारताकडे वळवली आहे. आयफोनचा समावेळ सध्या सर्वाधिक निर्यात होणाऱ्या टॉप १० उत्पादनांमध्ये झाला आहे. मागील दशकात देशाच्या स्मार्टफोन निर्यातीने मोठी झेप घेतली आहे. २०१५ मध्ये निर्यातीच्या बाबतीत स्मार्टफोन १६७व्या स्थानी होते. आता स्मार्टफोनने याबाबतीत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे.