आगामी काही वर्षात भारत जर्मनीलाही मागे टाकून जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलूक एप्रिल २०२५च्या ताज्या आवृत्तीनुसार भारत २०२५मध्ये जपानला मागे टाकून जगातील चौथी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था बनेल. भारताचा जीडीपी २०२५ मध्ये ४,१८७.०१७ अब्ज डॉलरपर्यंत पोहोचेल, अशी अपेक्षा आहे. हा जपानच्या अंदाजित ४,१८६.४३१ अब्ज डॉलरच्या जीडीपीपेक्षा अधिक आहे.
२०२४पर्यंत भारत जगातील पाचवी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था होता. आगामी वर्षांमध्ये, भारत जर्मनीला मागे टाकून तिसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था बनेल. २०२८पर्यंत भारताचा जीडीपी ५,५८४.४७६ अब्ज डॉलर इतका असेल. हा जर्मनीच्या ५,२५१.९२८ अब्ज डॉलरच्या जीडीपीपेक्षा अधिक आहे. (वृत्तसंस्था)
अमेरिका, चीनचे स्थान यांचे स्थान कायम राहणार
सन २०२५मध्ये अमेरिका आणि चीन हे दोन देश जगातील टॉप दोन मोठ्या अर्थव्यवस्था म्हणून कायम राहतील. दोन्ही देश संपूर्ण दशकात आपले स्थान कायम टिकवून ठेवतील.
गेल्या ८० वर्षांपासून बहुतांश देश ज्या जागतिक आर्थिक प्रणालीवर चालत आहेत तिची पुनर्रचना होत आहेत. जग एका नव्या युगात प्रवेश करीत आहे.
आयएमएफने २०२५साठी जीडीपी वाढीच्या दराचा अंदाज ६.२ टक्के इतका सांगितला. हा दर जानेवारीतील ६.५ % या पूर्वीच्या अंदाजापेक्षा कमी आहे.
ट्रम्प टॅरिफमुळे अनिश्चितता वाढली : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफबाबत घेतलेल्या निर्णयांमुळे व्यापारी तणाव आणि जागतिक अनिश्चितता वाढली आहे. त्यामुळे हा अंदाज खाली आला आहे. अहवालात म्हटले की, भारतासाठी, २०२५मध्ये वाढीचा दृष्टीकोन तुलनात्मकदृष्ट्या अधिक स्थिर ६.२ टक्के इतका आहे.
भारत २०२७ मध्ये ५ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनेल. भारताचा जीडीपा ५,०६९.४७ अब्ज डॉलरच्या घरात पोहोचलेला असेल. भारताच्या जीडीपीच्या वाढीत उत्पादन क्षेत्र, शेती आणि संबंधित उद्योग, पायाभूत सुविधांचा विकास, सेवा क्षेत्र आणि एमएसएमई या क्षेत्रांचे योगदान महत्त्वाचे असेल.
प्रमुख अर्थव्यवस्थांचे जीडीपी किती? (अब्ज डॉलरमध्ये)
अमेरिका ३०,५०७.२१७
चीन १९,२३१.७०५
जर्मनी ४,७४४.८०४
भारत ४,१८७.०१७
जपान ४,१८६.४३१
इंग्लंड ३,८३९.१८०
फ्रान्स ३,२११.२९२
इटली २,४२२.८५५
कॅनडा २,२२५.३४१
ब्राझील २,१२५.९५८