India-Russia Trade : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दबावाला न जुमानता, भारतानेरशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी कायम ठेवली आहे. सेंटर फॉर रिसर्च ऑन एनर्जी अँड क्लीन एअर (CREA) च्या मासिक मॉनिटरिंग रिपोर्टनुसार, भारताने ऑक्टोबर महिन्यात रशियाकडून 3.1 अब्ज युरो किंमतीचे कच्चे तेल आयात केले. चीननंतर भारत हा रशियाच्या कच्चा तेलाचा दुसरा सर्वात मोठा खरेदीदार आहे.
ऑक्टोबरमध्ये 2.5 अब्ज युरोंची कच्च्या तेलाची खरेदी
अहवालानुसार, भारताने ऑक्टोबरमध्ये 2.5 अब्ज युरोंचे कच्चे तेल, 351 मिलियन युरोंचा कोळसा आणि 222 मिलियन युरोंचे तेल उत्पादने आयात केली. विशेष म्हणजे, सप्टेंबरच्या तुलनेत ऑक्टोबर महिन्यात कच्च्या तेलाच्या आयातीत 11 टक्के वाढ नोंदवली गेली आहे.
पारंपरिकरीत्या मध्य-पूर्वेतील तेलावर अवलंबून असलेल्या भारताने फेब्रुवारी 2022 मधील रशिया-युक्रेन युद्धानंतर, सवलतीमुळे रशियन तेलाची आयात मोठ्या प्रमाणात वाढवली होती. काही महिन्यांतच रशियातील तेलाचा हिस्सा भारताच्या एकूण कच्च्या तेल आयातीतील 1 टक्क्यावरुन जवळपास 40 टक्क्यांवर पोहोचला. काही दिवसांपूर्वीच डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला होता की, भारताने रशियन तेलाची खरेदी कमी करण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, त्यांच्या दाव्यावर भारताकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही.
अमेरिकेच्या निर्बंधांपूर्वी मोठी खरेदी
22 ऑक्टोबरला अमेरिकेने युक्रेन युद्ध रोखण्यासाठी रशियातील दोन मोठ्या तेल उत्पादक कंपन्या रोसनेफ्ट आणि लुकऑयल यांच्यावर कडक निर्बंध लादले. या कारवाईनंतर रिलायन्स इंडस्ट्रीज, HPCL मित्तल एनर्जी आणि MRPL यांनी तात्पुरते रशियन तेलाचा आयात व्यवहार थांबवला आहे. मात्र, ऑक्टोबरमध्ये भारताने रशियन कच्च्या तेल आयातीत 11 टक्क्यांची वाढ झाल्याची माहिती समोर आल्याने, ट्रम्प यांना मोठा धक्का मानला जातोय.
