India- Russia Trade Deal : नुकतेच रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन भारत भेटीवर येऊन गेले. अमेरिका आणि इतर पाश्चात्त्य देशांनी शुल्क वाढवल्यामुळे भारतीय निर्यातीत काही प्रमाणात घट झाली होती. या पार्श्वभूमीवर पुतीन आणि पंतप्रधान मोदी यांच्यातील ही भेट अनेक अर्थांनी महत्त्वाची होती. भारत आणि रशिया या दोन जुन्या मित्रांनी त्यांच्या व्यापारी संबंधांना नवीन उंचीवर घेऊन जाण्यासाठी सहमती दर्शवली आहे. पुतीन मायदेशी परतताच भारताने या योजनेवर काम करण्यास सुरुवात केली आहे.
एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, भारताने अभियांत्रिकी, औषधे, कृषी आणि रसायने यांसारख्या क्षेत्रांतील जवळपास ३०० उत्पादनांची यादी तयार केली आहे. या उत्पादनांमुळे भारतीय निर्यातदारांना रशियन बाजारपेठेत आपले अस्तित्व वाढवण्याची मोठी संधी मिळणार आहे. दोन्ही देशांनी २०३० पर्यंत द्विपक्षीय व्यापार १०० अब्ज डॉलर्सपर्यंत नेण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट ठेवले आहे.
सध्याच्या व्यापारात मोठी तफावत
सध्या भारत आणि रशिया यांच्यातील व्यापारात मोठी तफावत आहे. भारत सध्या रशियाला केवळ १.७ अब्ज डॉलर्स किमतीच्या वस्तू निर्यात करतो, तर रशियाकडून भारताची आयात ३७.४ अब्ज डॉलर्स इतकी प्रचंड आहे. यामुळे भारताची रशियासोबतची व्यापार तूट ५९ अब्ज डॉलर्स इतकी मोठी आहे. शिपमेंटचे प्रमाण वाढवून ही व्यापार तूट कमी करण्याचा भारताचा प्रयत्न असेल.
रशियातून आयात १० पटीने वाढली
मागील काही वर्षांत रशियातून भारतात होणाऱ्या आयातीत जबरदस्त वाढ झाली आहे. २०१७ ते २०२१ या चार वर्षांत रशियाकडून भारताची आयात दहा पटीने वाढली आहे. २०२० मध्ये भारत रशियाकडून फक्त ५.९४ अब्ज डॉलर किमतीचा माल खरेदी करत होता. तर २०२४ मध्ये ही आयात वाढून ६४.२४ अब्ज डॉलरपर्यंत पोहोचली आहे. या वाढीमागे कच्च्या तेलाची आयात हे सर्वात मोठे कारण आहे. याशिवाय, भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणात खते आणि वनस्पती तेल देखील आयात करतो.
वाचा - सोने-चांदी पुन्हा महागले! खरेदी करण्यापूर्वी २२ कॅरेट आणि २४ कॅरेटचे दर पाहा; आणखी भाव वाढणार?
निर्यातीसाठी उच्च-क्षमता उत्पादने
देशाच्या वाणिज्य मंत्रालयाने अनेक महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये रशियाची आयात मागणी लक्षात घेऊन, भारताच्या पुरवठ्याला चालना देण्यासाठी उच्च-क्षमता उत्पादने निवडली आहेत. यामध्ये अभियांत्रिकी वस्तू, औषधे, कृषी आणि रासायनिक उत्पादनांचा समावेश आहे, जी रशिया सध्या इतर देशांकडून आयात करतो. याचा फायदा घेऊन भारतीय कंपन्यांना मोठा निर्यात अवकाश उपलब्ध होणार आहे. रशियाच्या एकूण आयात बास्केटमध्ये भारताचा वाटा सध्या केवळ २.३ टक्के आहे, जो वाढवण्यावर भर दिला जात आहे.
