India Post : ईमेल आणि सोशल मीडियाच्या जमान्यात आता पत्रव्यवहार फारच कमी प्रमाणात होतो. त्यामुळे भारतीय टपाल विभाग काय करणार? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. पण, पोस्टाने काळाप्रमाणे कात टाकत अधिक वेगवान आणि काळसुसंगत होण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी शुक्रवारी घोषणा केली की, जानेवारी २०२६ पासून इंडिया पोस्ट आपल्या सेवांमध्ये क्रांती घडवून आणत गॅरंटी-आधारित मेल आणि पार्सल डिलिव्हरी सेवा सुरू करणार आहे.
या नव्या सेवेमुळे आता ग्राहकांना त्यांचे सामान २४ तास किंवा ४८ तासांच्या आत गॅरंटीसह मिळेल. या निर्णयामुळे खासगी कुरिअर कंपन्यांना जोरदार स्पर्धा मिळण्याची शक्यता आहे.
नवीन सेवांचा तपशील आणि वेग
- मंत्र्यांनी सांगितले की, या नवीन सेवा सध्याच्या स्पीड पोस्ट नेटवर्कला अपग्रेड करतील.
- मेल डिलिव्हरी: मेलची डिलिव्हरी २४ तासांच्या आत सुनिश्चित केली जाईल.
- पार्सल डिलिव्हरी: पार्सलची डिलिव्हरी ४८ तासांच्या आत पूर्ण केली जाईल.
- 'पुढील दिवसाची डिलिव्हरी' : सिंधिया यांनी 'पुढील दिवशी पार्सल डिलिव्हरी' सेवा सुरू करण्याची घोषणाही केली आहे. सध्या पार्सल वितरणाला लागणारा ३ ते ५ दिवसांचा कालावधी कमी होऊन, पार्सल पुढील दिवशीच डिलीव्हर होऊ शकेल, ज्यामुळे वेळेची मोठी बचत होईल.
इंडिया पोस्ट होणार 'नफा केंद्र'
केंद्रीय मंत्र्यांनी इंडिया पोस्टच्या आर्थिक भविष्यावरही लक्ष केंद्रित केले आहे. सध्या इंडिया पोस्टला केवळ 'खर्च केंद्र मानले जाते. परंतु, सरकारचे व्यापक उद्दिष्ट आहे की, २०२९ पर्यंत भारतीय टपाल विभागाला एक 'प्रॉफिट सेंटर'मध्ये रूपांतरित करणे आहे.
वाचा - टाटा कंपनीचा 'हा' स्टॉक झुनझुनवाला कुटुंबासाठी ठरला मल्टीबॅगर; एका दिवसात ४०० कोटींचा नफा
वेळेवर आणि विश्वासार्ह डिलिव्हरीची हमी देऊन, इंडिया पोस्ट खासगी कंपन्यांशी स्पर्धा करेल. या गॅरंटीड सेवेमुळे टपाल विभागाच्या कार्यक्षमतेत आणि महसुलात मोठी वाढ होण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे ते एक 'नफा कमावणारे' सरकारी युनिट म्हणून उभे राहू शकेल.