India China News: चीन ही जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे आणि केवळ रेअर अर्थ मेटल्सवरच नाही, तर इतर अनेक गोष्टींवर त्यांचं वर्चस्व आहे. तांदूळाचाही आतापर्यंत यामध्ये समावेश होता, परंतु चीनचं अनेक वर्षांपासून चालत आलेलं हे वर्चस्व भारतानं मोडीत काढलंय. तांदूळ उत्पादनात भारत जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर (India Overtook China In Rice Production) पोहोचून 'बादशाह' बनलाय.
अमेरिकेनंही मानलं भारत आहे नंबर-१
जागतिक तांदूळ उत्पादनात भारताचा वाटा आता २८% पेक्षा जास्त झाला आहे आणि खुद्द अमेरिकन कृषी विभागानं (USDA) भारताचं हे यश मान्य केलंय. यूएसडीएनं आपल्या डिसेंबर २०२५ च्या अहवालातील आकडेवारी शेअर करताना सांगितलं की, भारताचं तांदूळ उत्पादन १५२ दशलक्ष मेट्रिक टनांवर पोहोचलंय, तर आतापर्यंत या क्षेत्रात वर्चस्व गाजवणाऱ्या चीनचं उत्पादन १४६ दशलक्ष मेट्रिक टन राहिलंय. अशाप्रकारे भारत पहिल्या क्रमांकावर पोहोचून जगात 'तांदळाचा बादशाह' बनला आहे.
ड्रॅगनसाठी ही मोठी चिंता
जिथे भारतानं मोठी कामगिरी करून दाखवली आहे, तिथेच भारताच्या या यशामुळे चीन जगातील सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश असल्याचा जुना समज मोडीत निघालाय. या क्षेत्रातील चीनचं वर्चस्व कमी होणं ही ड्रॅगनसाठी मोठी चिंतेची बाब बनली आहे. अहवालानुसार, भारताच्या या यशाचा एक रंजक पैलू म्हणजे तैवानकडून मिळालेलं महत्त्वपूर्ण योगदान हे देखील आहे. विशेष म्हणजे चीन आणि तैवानमधील संबंध अत्यंत तणावपूर्ण आहेत.
१७२ देशांत भारताचा तांदूळ
साधारणपणे जेव्हा जेव्हा तांदळाचा विषय येतो तेव्हा सर्वात आधी भारताचंच नाव घेतलं जातं. मात्र, तांदूळ उत्पादनाच्या बाबतीत भारत बऱ्याच काळापासून चीनच्या मागे होता. आता पहिल्यांदाच भारतानं तांदूळ उत्पादनात चीनला मागे टाकलंय. इंटरनॅशनल राईस इन्स्टिट्युट (International Rice Institute) दक्षिण आशिया प्रादेशिक केंद्राचे संचालक डॉ. सुधांशु सिंह म्हणाले की, भारताचे जगातील सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश म्हणून उदयास येणं ही मोठी बाब आहे. भारतीय तांदूळ १७२ देशांना निर्यात केला जातो आणि तांदूळ हे भारताच्या परराष्ट्र धोरणाचं एक महत्त्वाचं साधन बनलं आहे.
तांदळापासून मिळणारं उत्पन्न
जगात तांदळाच्या सुमारे १,२३,००० जाती आहेत, ज्यापैकी सुमारे ६०,००० जाती एकट्या भारतात आढळतात. तांदळाच्या कमाईबद्दल बोलायचं झालं तर, आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये भारतानं विक्रमी ४,५०,८४० कोटी रुपये मूल्याच्या कृषी उत्पादनांची निर्यात केली आणि यात तांदळाचा वाटा सर्वात मोठा (सुमारे २४%) होता. भारतानं बासमती आणि बिगर बासमती तांदळाची निर्यात करून एकाच वर्षात १,०५,७२० कोटी रुपयांचं परकीय चलन मिळवलं, जे भारतीय अर्थव्यवस्थेत तांदळाचे महत्त्व आणि योगदान किती आहे हे दर्शवतं.
