लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली: चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत भारताने २४ देशांना केलेल्या निर्यातीत सकारात्मक वाढ नोंदवली आहे. अधिकृत आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे. अमेरिकन टॅरिफचा फार मोठा फटका भारताला बसला नाही, असे यातून दिसते.
या २४ देशांमध्ये दक्षिण कोरिया, संयुक्त अरब अमिरात (यूएई), जर्मनी, टोगो, इजिप्त, व्हिएतनाम, इराक, मेक्सिको, रशिया, केनिया, नायजेरिया, कॅनडा, पोलंड, श्रीलंका, ओमान, थायलंड, बांगलादेश, ब्राझील, बेल्जियम, इटली आणि टांझानिया यांचा समावेश आहे. सप्टेंबरमध्ये अमेरिकेने लादलेल्या टॅरिफमुळे अमेरिकेला होणाऱ्या भारताच्या निर्यातीत घट झाली आहे.
एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, “या २४ देशांना एप्रिल-सप्टेंबर २०२५ या कालावधीत एकूण १२९.३ अब्ज डॉलर्सची निर्यात झाली. ही रक्कम मागील वर्षाच्या याच कालावधीपेक्षा जास्त असून भारताच्या एकूण निर्यातीत ५९% एवढा वाटा दर्शवते.” एप्रिल-सप्टेंबर २०२५ दरम्यान भारताची एकूण निर्यात ३.०२% वाढून २२०.१२ अब्ज डॉलर्स झाली. आयात ४.५३% वाढून ३७५.११ अब्ज डॉलर्स इतकी झाली.