अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे उद्योग सल्लागार असलेल्या पीटर नवारो यांनी भारताला लक्ष्य केले. भारत टॅरिफचा महाराजा आहे, अशी टीका करत भारताची उद्योग धोरणे अमेरिकेतील कामगारांना नुकसान पोहचवणारी आहे, असा आरोप त्यांनी केला.
भारत आणि अमेरिकेमध्ये व्यापार करार होण्यापूर्वीच टॅरिफवरून तणाव निर्माण झालेला आहे. अमेरिकेने भारतावर ५० टक्के टॅरिफ लादला असून, यात भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याचा दंड म्हणून २५ टक्के टॅरिफचाही समावेश आहे. दोन्ही देशातील संबंध तणाले गेलेले असतानाच नवारोंनी भारतावर टीका केली आहे.
पीटर नवारोंनी भारताबद्दल काय म्हटलंय?
सीएनबीसी इंटरनॅशनलला दिलेल्या मुलाखतीत पीटर नवारोने म्हटलं आहे की, "युक्रेनवरील हल्ल्यानंतर लगेच भारतीय तेल कंपन्यांनी रशियासोबत व्यवहार केल. ते आमच्यासोबत (अमेरिका) चुकीच्या पद्धतीने व्यापार करून पैसा कमावत आहेत आणि याचा फटका अमेरिकन कामगारांना बसत आहे. भारत त्याच पैशातून रशियाकडून तेल खरेदी करतो आणि रशिया त्या पैशांचा वापर शस्त्र खरेदीसाठी करत आहे."
"भारतासाठी चीन दीर्घकाळापासून मोठा धोका राहिलेला आहे. अशावेळी मोदी जिनपिंग आणि पुतीनसोबत एकत्र दिसणे आश्चर्यचकित करणारं होतं. मला नाही वाटत की मोदी तिथे सहज वावरत होते", असे नवारो म्हणाले.