India and China :भारताने गुरुवारी चीनविरुद्ध मोठा आर्थिक निर्णय घेत, तिथून आयात होणाऱ्या विशिष्ट पोलाद उत्पादनांवर पुढील पाच वर्षांसाठी 'अँटी-डंपिंग ड्युटी' लागू केली आहे. चीनकडून स्वस्त दरात होणाऱ्या पोलाद आयातीमुळे भारतीय उद्योगांचे होणारे नुकसान रोखण्यासाठी केंद्र सरकारने हे पाऊल उचलले आहे. यामुळे आता चिनी स्टीलवर प्रति टन २२३.८ डॉलर ते ४१४.९ डॉलर इतका अतिरिक्त कर आकारला जाणार आहे.
'CRNO' स्टीलवर निर्बंधांचा हातोडा
व्यापार उपचार महासंचालनालयच्या अधिसूचनेनुसार, प्रामुख्याने 'कोल्ड रोल्ड नॉन-ओरिएंटेड इलेक्ट्रिकल स्टील'च्या आयातीवर २२३.८२ डॉलर प्रति टन इतका टॅरिफ लागू होईल. या स्टीलचा वापर प्रामुख्याने इलेक्ट्रिक मोटर्स, जनरेटर आणि छोट्या ट्रान्सफॉर्मर्ससारख्या उपकरणांमध्ये केला जातो. सरकारने 'कोल्ड रोल्ड फुल हार्ड सिलिकॉन इलेक्ट्रिकल स्टील' या उत्पादनाला मात्र या शुल्कातून सध्या वगळले आहे.
का घेतला निर्णय?
चीन आपले जास्तीचे उत्पादन जागतिक बाजारपेठेत, विशेषतः भारतात, अत्यंत कमी किमतीत विकत आहे. यामुळे भारतीय पोलाद उत्पादकांना स्पर्धा करणे कठीण जात होते आणि त्यांच्या नफ्यावर परिणाम होत होता. स्वस्त आयातीला अटकाव केल्यामुळे भारतीय कंपन्यांना बाजारपेठेत समान संधी मिळेल आणि 'मेक इन इंडिया' मोहिमेला बळ मिळेल. भारतीय स्टील उद्योगाच्या तक्रारीनंतर व्यापार उपचार महासंचालनालयने या प्रकरणाची सखोल चौकशी केली आणि ही ड्युटी लावण्याची शिफारस केली होती.
आयातीची आकडेवारी काय सांगते?
मार्केट रिसर्च फर्म 'बिगमिंट'च्या अहवालानुसार, आर्थिक वर्ष २०२५ मध्ये भारताची स्टेनलेस स्टील आयात वाढून १.७३ दशलक्ष टनांवर पोहोचली आहे. यामध्ये चीनसोबतच इंडोनेशिया, व्हिएतनाम आणि दक्षिण कोरियाचा मोठा वाटा आहे. विशेष म्हणजे, २०२५ च्या पहिल्या नऊ महिन्यांत चीनची जागतिक स्टील निर्यात ८.८ कोटी टनांच्या विक्रमी स्तरावर पोहोचली आहे, ज्यामुळे जागतिक स्तरावर स्टीलच्या किमती दबावाखाली आहेत.
वाचा - गृहकर्जावर होईल १८ लाख रुपयांपर्यंतची बचत! EMI कमी करण्यापेक्षा वापरावा लागेल 'हा' पर्याय
'अँटी-डंपिंग ड्युटी' म्हणजे काय?
जेव्हा एखादा देश त्याच्या देशांतर्गत किमतीपेक्षा कमी किमतीत दुसऱ्या देशात माल निर्यात करतो, तेव्हा त्याला 'डंपिंग' म्हणतात. यामुळे ज्या देशात माल येतो तिथल्या स्थानिक कंपन्यांचे नुकसान होते. हे नुकसान भरून काढण्यासाठी आणि व्यापार संतुलित करण्यासाठी सरकार आयातीवर जो अतिरिक्त कर लावते, त्याला 'अँटी-डंपिंग ड्युटी' म्हटले जाते.
