India Fuel Crisis: मध्यपूर्वेतील युद्धामुळे जगभरातील अनेक देशांमध्ये उर्जा संकट निर्माण झाले आहे. या युद्धची झळ भारतालाही बसत असून, घरगुती आणि व्यावसायिक सिलेंडरच्या पुरवठ्यावर मोठा परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे. अशा तणावाच्या परिस्थितीत, उद्योगांसाठी दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. गौतम अदानी यांच्या नेतृत्वातील अदानी टोटल गॅसने (ATGL) नैसर्गिक वायूच्या दरात मोठी कपात करण्याची घोषणा केली आहे.
यापूर्वी सुमारे १२० रुपये प्रति स्टँडर्ड क्यूबिक मीटर (SCM) दराने मिळणारी अतिरिक्त गॅस, आता सुमारे ८३ रुपये प्रति SCM दराने उपलब्ध होणार आहे. हे नवीन दर उद्या(१६ मार्च २०२६) रोजी सकाळी ६ वाजल्यापासून लागू होणार आहे.
उद्योगांना थेट फायदा
या निर्णयाचा सर्वाधिक फायदा मोठ्या औद्योगिक युनिट्स आणि कारखान्यांना होणार आहे. कंपनीच्या नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार, जे उद्योग त्यांच्या निश्चित कोट्यापेक्षा जास्त गॅस वापरतात, त्यांच्यासाठी ‘एक्स्ट्रा गॅस’च्या दरात मोठी कपात करण्यात आली आहे. पूर्वी अतिरिक्त वापरासाठी उद्योगांना ११९.९० रुपये प्रति SCM दराने पैसे मोजावे लागत होते. आता हा दर कमी करून ८२.९५ रुपये प्रति SCM करण्यात आला आहे. म्हणजेच प्रति SCM सुमारे ३७ रुपयांची घट झाली आहे. नैसर्गिक वायूवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असलेल्या उद्योगांसाठी हा निर्णय मोठा दिलासा मानला जात आहे.
४० टक्के वापराची मर्यादा
यापूर्वी मध्यपूर्वेतील महत्त्वाच्या समुद्री मार्गांपैकी एक असलेल्या Strait of Hormuz परिसरात जहाजांच्या हालचालींमध्ये अडथळे निर्माण झाल्याने भारतातील लिक्विफाइड नॅचरल गॅस (LNG) पुरवठ्यावर परिणाम झाला होता. या पार्श्वभूमीवर अदाणी समूह आणि TotalEnergies यांच्या संयुक्त उपक्रमाने औद्योगिक ग्राहकांसाठी एक कठोर नियम लागू केला होता. त्यानुसार कंपन्यांना त्यांच्या निश्चित कोट्याच्या फक्त ४० टक्के गॅस वापरण्याची परवानगी देण्यात आली होती. या मर्यादेपेक्षा जास्त वापर झाल्यास उद्योगांना स्पॉट मार्केटच्या महाग दराने, म्हणजेच ११९.९० रुपये प्रति SCM शुल्क आकारले जात होते.
दरकपातीमागील कारण
आता कंपनीने दरकपात करत कंपन्यांना मोठा दिलासा दिला आहे. या दरकपातीमागील कारणही कंपनीने स्पष्ट केले आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, आंतरराष्ट्रीय बाजारात अपस्ट्रीम गॅसच्या किमती कमी होऊ लागल्या आहेत. त्यामुळे त्याचा थेट फायदा ग्राहकांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कंपनीने स्पष्ट केले की, या निर्णयामागे केवळ नफा कमावण्याचा उद्देश नसून, सध्याच्या पुरवठा संकटाच्या काळात ऊर्जा व्यवस्थेची स्थिरता राखणे हा प्रमुख हेतू आहे.
उद्योगांसाठी दिलासा
ऊर्जा खर्च वाढल्यामुळे अनेक उद्योगांवर आर्थिक ताण निर्माण झाला होता. अशा परिस्थितीत अतिरिक्त गॅसच्या दरात झालेली ही मोठी कपात उद्योगांच्या उत्पादन खर्चात घट करण्यास मदत करू शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे. दरकपातीमुळे विशेषतः गॅसवर आधारित उत्पादन करणाऱ्या उद्योगांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
