India EV Market 2025 Report : भारतात इलेक्ट्रिक वाहनांची लाट आता केवळ चर्चा उरली नसून ती एक वास्तव बनली आहे. सरत्या २०२५ वर्षात भारतीय वाहन बाजाराने नवा इतिहास रचला असून, वर्षभरात तब्बल २३ लाख इलेक्ट्रिक वाहनांची विक्री झाली आहे. 'इंडिया एनर्जी स्टोरेज अलायन्स'च्या ताज्या अहवालानुसार, देशातील एकूण वाहन नोंदणीमध्ये ई-वाहनांचा वाटा आता ८ टक्क्यांवर पोहोचला असून, ग्राहकांचा कल झपाट्याने 'ग्रीन मोबिलिटी'कडे वळत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
दोन चाकी वाहनांची 'बॅटरी' जोरात!
२०२५ मध्ये भारतात एकूण २.८२ कोटी वाहनांची नोंदणी झाली. यामध्ये इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये दोन चाकी वाहनांनी मैदान मारले आहे.
- इलेक्ट्रिक टू-व्हीलर : १२.८ लाख युनिट्स (एकूण ई-वाहन विक्रीच्या ५७% वाटा).
- इलेक्ट्रिक थ्री-व्हीलर : ८ लाख युनिट्स (३५% वाटा).
- इलेक्ट्रिक कार : १.७५ लाख युनिट्स.
- तज्ज्ञांच्या मते, लॉजिस्टिक आणि ई-कॉमर्स डिलिव्हरी क्षेत्रात इलेक्ट्रिक चारचाकी (लाईट गुड्स कॅरिअर) वाहनांचा वापर वाढल्याने या सेगमेंटला मोठी चालना मिळाली आहे.
ई-वाहन विक्रीत राज्यांची कामगिरी
देशातील एकूण विक्रीपैकी ४०% वाटा केवळ तीन राज्यांचा आहे.
- उत्तर प्रदेश : ४ लाखाहून अधिक विक्रीसह देशात प्रथम.
- महाराष्ट्र : २.६६ लाख विक्रीसह दुसऱ्या क्रमांकावर.
- कर्नाटक : २ लाख विक्रीसह तिसऱ्या स्थानी.
विशेष म्हणजे, दिल्ली (१४%), केरळ (१२%) आणि गोवा (११%) या राज्यांमध्ये एकूण विक्रीच्या तुलनेत ई-वाहनांचे प्रमाण सर्वाधिक आहे. ईशान्येकडील त्रिपुरा आणि आसाम या राज्यांनीही ई-वाहनांच्या बाबतीत अनपेक्षित प्रगती केली आहे.
सार्वजनिक वाहतुकीचा कायापालट
२०२५ मधील सर्वात मोठा धोरणात्मक निर्णय इलेक्ट्रिक बसेसबाबत राहिला. केंद्र सरकारच्या 'PM E-DRIVE' योजनेअंतर्गत १०,९०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, १०,९०० इलेक्ट्रिक बसेससाठीचे टेंडर पूर्ण झाले आहे. यामुळे शहरांमधील सार्वजनिक वाहतूक प्रदूषणमुक्त होण्यास मदत होणार आहे.
वाचा - फॉर्म भरण्याचा त्रास संपला! UPI द्वारे PF काढता येणार; अवघ्या काही सेकंदात पैसे बँक खात्यात जमा
सण-उत्सवांचा 'बूस्ट'
अहवालानुसार, २०२५ च्या पहिल्या सहामाहीत विक्रीचा वेग मध्यम होता. मात्र, शेवटच्या तिमाहीत म्हणजेच दसरा-दिवाळीच्या काळात ग्राहकांनी इलेक्ट्रिक वाहनांना मोठी पसंती दिली. सरकारी सबसिडी, वाढते चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर आणि पेट्रोलच्या वाढत्या किमती यामुळे मध्यमवर्गीय ग्राहकांनी इलेक्ट्रिक पर्यायाची निवड केली आहे.
