बर्लिन/नवी दिल्ली : भारत कोणताही व्यापार करार घाईघाईत किंवा कोणाच्याही दबावाखाली येऊन करत नाही, अशा शब्दांत वाणिज्य व उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी अमेरिकेला ठणकावले आहे.
जर्मनीतील ‘बर्लिन डायलॉग’ या कार्यक्रमात गोयल यांनी हे वक्तव्य केले. त्यांनी सांगितले की, भारत सध्या युरोपीय महासंघ (ईयू) आणि अमेरिकेसह अनेक देशांशी व प्रादेशिक गटांशी व्यापार करारांबाबत सक्रिय चर्चा करीत आहे. आम्ही ‘ईयू’सोबत सातत्याने संवाद साधत आहोत, तसेच अमेरिकेशीही बोलणी सुरू आहेत. परंतु आम्ही कधीही वेळेच्या बंधनात किंवा दबावाखाली व्यवहार करत नाही. व्यापार करारांकडे दीर्घकालीन दृष्टीकोनातून पाहिले गेले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
भारत-अमेरिका व्यापार करार अंतिम टप्प्यात
भारत-अमेरिका यांच्यातील द्विपक्षीय व्यापार करार अंतिम टप्प्यात असून, बहुतेक मुद्द्यांवर दोन्ही देशांत सहमती झाली आहे, असे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. दोन्ही देश सध्या कराराच्या भाषेवर अंतिम काम करत आहेत. आम्ही कराराच्या खूप जवळ आहोत. आता फारसे मतभेद शिल्लक नाहीत. करारावरील चर्चा सुरळीत सुरू असून, कोणताही नवीन मुद्दा अडथळा ठरत नाही. बहुतेक विषयांवर आमची एकवाक्यता झाली आहे. भारत-अमेरिका व्यापार कराराच्या पहिल्या टप्प्यासाठी आतापर्यंत चर्चांच्या ५ फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत, असेही अधिकाऱ्याने सांगितले.
