donald trump reciprocal tariff : 'शत्रूचा शत्रू तो आपला मित्र' ही प्राचीन म्हण प्रसिद्ध आहे. सध्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ दहशतवादाविरोधात अनेक राष्ट्र एकत्र येत आहेत. अमेरिका आणि चीन या जगातील २ मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये कायमच कुरघोडी सुरू असते. या तणावाच्या पार्श्वभूमीवर चीनने भारताकडे मैत्रीचा हात पुढे केला आहे. चीनने भारताकडून अधिकाधिक वस्तू खरेदी करण्याची आणि व्यापार सहकार्याला चालना देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. बीजिंगमधील चीनचे भारतातील राजदूत झू फेहॉन्ग म्हणाले की, भारत आणि चीनने नवीन व्यापार संधी शोधल्या पाहिजेत. भारतीय उद्योगांना आता चिनी बाजारपेठेत आपले स्थान निर्माण करण्यची संधी चालून आली आहे. यातून काही वर्षांपासून दोन्ही देशांतील तणाव निवळण्याची शक्यताही व्यक्त करण्यात येत आहे.
चीनची पहिल्यांदाच नरमाईची भूमिका?
गेल्या काही वर्षांपासून भारताकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्या चीनला आता भारताकडे हात पसरण्यावाचून पर्याय राहिलेला नाही. झू फेहॉन्ग यांनी ग्लोबल टाइम्सला सांगितले की, "आम्ही भारतासोबत व्यापार आणि आर्थिक सहकार्य मजबूत करण्यासाठी तयार आहोत. चीनी बाजारपेठेसाठी योग्य असलेली जास्तीत जास्त भारतीय उत्पादने आयात करू इच्छितो." त्यांनी भारतीय कंपन्यांना चीनमध्ये व्यवसायाच्या संधी शोधण्याचे निमंत्रण दिले आहे. भारतीय उद्योजक आता हिमालय पार करून चीनच्या विकासात भागीदार होऊ शकतात, असंही त्यांनी म्हटलं आहे.
भारत चीनला व्यावसायिक सुविधा देणार का?
चीननेही भारताकडून चिनी कंपन्यांसाठी निष्पक्ष आणि पारदर्शक व्यावसायिक वातावरण निर्माण होईल, अशी आशा व्यक्त केली आहे. दोन्ही देशांमधील व्यापारी संबंध आणखी विस्तारण्याची चर्चा आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना संदेश पाठवून दोन्ही देशांना जवळ आणण्यावर भर दिला असताना हे वक्तव्य आले आहे. भारत-चीन राजनैतिक संबंधांच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त हा संदेश देण्यात आला.
सीमावादानंतर संबंधात बदल
२०२० मध्ये गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर भारत आणि चीन आपले संबंध सुधारण्याचा प्रयत्न करत आहेत. या संघर्षानंतर भारताने अनेक चीनी गुंतवणुकीवर बंदी घातली होती, जी आजतागायत सुरू आहे. अलीकडेच दोन्ही देशांनी परस्पर गस्तीवर एक करार केला. त्यानंतर जानेवारी २०२४ मध्ये थेट उड्डाणे पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला.
वाचा - यूके, ब्राझीलसारख्या देशांवर केवळ १० टक्के, मग भारतावर २६ टक्के टॅरिफ का? ट्रम्प स्पष्टच बोलले...
टॅरिफ आणखी वाढणार
ट्रम्प सरकारने सध्या फक्त ५० टक्केच टॅरिफ लागू केला आहे. म्हणजे एखादा देश अमेरिकन उत्पादनांवर ४० टक्के आयात शुल्क लादत असेल तर त्या देशावर २० टक्केच कर लागू केला आहे. पण, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प लवकरच परस्पर शुल्क लागू करणार आहेत, ज्यामुळे जागतिक व्यापार व्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो. ट्रम्प म्हणतात की त्यांना अमेरिकन उद्योगांना सुवर्ण युगात घेऊन जायचे आहे. अमेरिकेबरोबर व्यापारी अन्याय थांबवायचा आहे.