India-America Trade Deal: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय मालावर लादलेल्या 'हाय टॅरिफ'नंतर भारतातील निर्यातदारांनी आपला मोर्चा इतर देशांकडे वळवला आहे. या प्रयत्नांना यश मिळताना दिसत असून, युरोपातील अनेक देशांमध्ये भारतीय निर्यातीत लक्षणीय वाढ नोंदवली गेली आहे.
भारताचे वाणिज्य मंत्रालयच्या ताज्या आकडेवारीनुसार, स्पेन, जर्मनी, बेल्जियम आणि पोलंड हे 27 देशांच्या युरोपियन ब्लॉकमध्ये भारतीय वस्तूंसाठी स्थिर आणि प्रमुख निर्यात गंतव्यस्थान म्हणून पुढे येत आहेत.
स्पेनमध्ये भारतीय निर्यातीला सर्वाधिक गती
आकडेवारीनुसार, चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत स्पेनकडे होणाऱ्या भारतीय निर्यातीत 56 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. मागील वर्षी याच कालावधीत 3 अब्ज डॉलर्सवरुन, चालू वर्षात 4.7 अब्ज डॉलर्स निर्यात झाली आहे. यामुळे भारताच्या एकूण निर्यातीत स्पेनचा वाटा 2.4 टक्क्यांवर पोहोचला असून, त्यात 0.5 टक्के पॉइंट्सची लक्षणीय वाढ झाली आहे.
जर्मनीकडे निर्यात स्थिर, पण मजबूत
याच कालावधीत जर्मनीकडे भारताची निर्यात 9.3 टक्क्यांनी वाढून 6.8 अब्ज डॉलरवरून 7.5 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचली आहे. भारताच्या एकूण निर्यातीत 2.6 टक्के वाटा आणि 0.2 टक्के पॉइंट्सच्या वाढीमुळे जर्मनी भारतीय उत्पादनांसाठी सातत्यपूर्ण मागणी राखून आहे.
बेल्जियम आणि पोलंडमध्येही सकारात्मक कल
चालू आर्थिक वर्षात एप्रिल-नोव्हेंबर 2025-26 दरम्यान बेल्जियमकडे निर्यात 4.2 अब्ज डॉलर्सवरून 4.4 अब्ज डॉलरपर्यंत वाढली आहे, तर पोलंडकडे 7.6 टक्क्यांनी वाढून 1.69 अब्ज डॉलर्सवरून 1.82 अब्ज डॉलर्स झाली आहे. ही वाढ मध्यम असली, तरी सातत्यपूर्ण आहे.
भारताची युरोपसाठी संतुलित निर्यात रणनीती
वाणिज्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांच्या मते, हे आकडे भारताच्या युरोपकेंद्रित निर्यात धोरणाचे प्रतिबिंब आहेत. स्पेनमध्ये वेगाने वाढणारी मागणी, जर्मनीमध्ये स्थिर आणि विश्वासार्ह बाजार, बेल्जियममध्ये सातत्य आणि पोलंडसारख्या उदयोन्मुख बाजारात हळूहळू होत असलेल्या वाढीतून भारताची निर्यात धोरणे जुन्या बाजारांतील मजबुती आणि नव्या बाजारांतील विविधीकरण या दोन्ही बाबींवर आधारित असल्याचे दिसते.
