income Tax Return : सध्या जो-तो प्राप्तीकर परतावा भरण्याच्या गडबडीत आहे. नोकरदारांपासून ते व्यावसायिकांपर्यंत सर्वजण प्राप्तीकर परतावा (ITR) भरत आहेत. तुम्ही देखील आयटीआर भरण्याची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. जर तुम्ही आयकर विभागाकडे कर कपातीचे खोटे दावे केले, तर तुम्हाला खूप मोठा दंड भरावा लागू शकतो. कारण, आता आयकर विभाग खोट्या दाव्यांची चौकशी करण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) आणि डेटा अॅनालिटिक्सचा वापर करत आहे!
हा बदल आयकर विभागाच्या फसवणुकीला आळा घालण्याच्या धोरणाचा एक भाग आहे, विशेषतः 'गॅरंटीड रिफंड'चा दावा करणाऱ्या एजंट्सकडून चालवल्या जाणाऱ्या फसवणुकीला आळा घालण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.
कोणत्या दाव्यांवर आयकर विभागाची नजर?
अधिकाऱ्यांनी सांगितले, की काही लोकप्रिय वजावटीच्या कलमांचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर होत आहे.
- कलम १०(१३अ) अंतर्गत घरभाडे भत्ता (HRA) : म्हणजे भाड्याच्या घरात राहत नसतानाही एचआरएचा दावा करणे.
- कलम ८०जी अंतर्गत देणग्या : खोट्या देणग्या दाखवून कर कपात मिळवणे.
- कलम ८० च्या विविध कलमांखाली कर्ज व्याज : वैद्यकीय किंवा शैक्षणिक कर्जावरील व्याजाचे खोटे दावे करणे.
तज्ज्ञांच्या मते, आयकर विभागाचे AI आता तुमच्या TDS डेटा, बँक रेकॉर्ड आणि इतर अनेक थर्ड पार्टी स्रोतांकडून मिळालेल्या माहितीसोबत या दाव्यांची पडताळणी करत आहे. म्हणजे, तुम्ही काहीही लपवू शकणार नाही.
मोठा दंड आणि ७ वर्षांपर्यंत तुरुंगवासही होऊ शकतो!
जर तुम्हीही खोटे दावे केले आणि आयकर विभागाच्या AI सिस्टिमने तुम्हाला पकडले, तर आयकर कायद्यात कठोर दंडाची तरतूद आहे.
- कर दायित्वाच्या २००% पर्यंत दंड आकारला जाऊ शकतो.
- यावर वार्षिक २४% पर्यंत व्याजदर लागू होऊ शकतात.
- गंभीर उल्लंघन करणाऱ्यांवर खटला चालवला जाऊ शकतो.
- यामध्ये जाणूनबुजून कर चुकवेगिरी केल्याबद्दल कलम २७६C अंतर्गत सात वर्षांपर्यंतच्या कारावासाची शिक्षा देखील होऊ शकते.
AI सिस्टिम लगेच शोधतेय चुका!
तज्ञांच्या मते, आयकर विभागाची AI संचालित प्रणाली आता खूप सक्रिय झाली आहे. ती आयकर विवरणपत्रे (ITR) आणि AIS (Annual Information Statement) तसेच फॉर्म २६AS मधून मिळालेल्या उत्पन्नाच्या डेटामधील तफावत लगेच शोधून काढते आणि त्या त्रुटींची नोंद करते.
छोटी चूकही महागात पडू शकते
आता या डेटातील एक छोटीशी चूक देखील तुम्हाला आयकर विभागाची नोटीस पाठवू शकते. तज्ज्ञांनी म्हटले आहे की, आता फक्त फॉर्म भरणे पुरेसे नाही. तुम्ही केलेल्या प्रत्येक दाव्याच्या समर्थनासाठी तुमच्याकडे ठोस कागदपत्रे असणे आवश्यक आहे. करदात्यांना संशयास्पद 'रिफंड एजंट्स'वर विश्वास ठेवण्यापासून सावध केले आहे आणि त्यांचे दावे पडताळण्यासाठी तपशीलवार नोंदी ठेवण्यास प्रोत्साहित केले आहे.
वाचा - महिलेने ९ भिक्षूंना ब्लॅकमेल करून उकळले तब्बल १०२ कोटी रुपये; घरी सापडले ८०,००० अश्लील व्हिडिओ!
काय करावे?
जर तुमच्याकडून काही चूक झाली असेल किंवा खोटा दावा दाखल झाला असेल, तर कोणतीही चूक दुरुस्त करण्यासाठी आणि संभाव्य दंड टाळण्यासाठी तुम्ही ITR-U (Updated ITR) त्वरित दाखल करा. आत्ताच ITR-U दाखल केल्याने तुम्हाला नंतर कठोर दंड आणि खटले टाळण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे, वेळीच सावध व्हा आणि योग्य माहितीच आयकर विभागाला द्या!