Tax Deduction Claims : आयकर विभागाने मोठ्या प्रमाणात खोटे परतावा दावे करणाऱ्या कर्मचाऱ्यांबाबत धक्कादायक माहिती समोर आणली आहे. खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या ९०,००० पगारदार करदात्यांनी १,०७० कोटी रुपयांचे चुकीचे कर दावे केल्याचे उघड झालं आहे. सुमारे ९० हजार पगारदार कर्मचाऱ्यांनी ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत चुकीच्या कर कपातीच्या दाव्यांमधून १,७० कोटी रुपये मिळवले आहेत. अशा लोकांनी चुकीच्या पद्धतीने केलेले कर कपातीचे दावे केल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
आयकर विभागाने केलेल्या वेगवेगळ्या शोध, जप्ती आणि सर्वेक्षण ऑपरेशन्स दरम्यान ही धक्कादायक माहिती उघड झाली आहे. कर्मचाऱ्यांनी इन्कम टॅक्स रिटर्नच्या कलम ८०C, ८०D, ८०E, ८०G, ८०GGB, ८०GGC अंतर्गत चुकीच्या कर कपातीचा दावा करून त्यांचे कर लाभ घेतले आहेत. असे लोक सार्वजनिक क्षेत्रातील, मल्टी नॅशनल आणि प्रायव्हेट लिमिटेड कंपन्यांसह विविध क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांचे कर्मचारी असल्याचे समोर आलं आहे.
माध्यमांच्या वृत्तानुसार, करकपातीचे असे दावे करणारे बहुतेक लोक एकाच कंपनीत काम करत होते. आयकर विभागाच्या तपासात आणखी एक घोटाळा समोर आला आहे. आयटीआरच्या कलम ८०GGB/८०GGC अंतर्गत करदात्यांनी दावा केलेल्या आयटीआरमध्ये दाखवलेल्या एकूण पावत्यांमध्ये मोठा फरक आढळला आहे. इतकेच नाही तर कलम ८०C, ८०E, ८०G अंतर्गत केलेले दावे देखील संशयास्पद असल्याचे दिसून आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, टीडीएसचा दावा करणाऱ्या अशा कर्मचाऱ्यांची ओळख पटली आहे. कर विभाग कलम ८०E, ८०G, ८०GGA, ८०GGC आणि इतर कपाती अंतर्गत बनावट कपातीचा दावा करत असल्याचा संशय असलेल्या जास्तीत जास्त लोकांशी संपर्क साधणार आहे. काही लोकांनी चुकीच्या कपाती/परताव्याचा दावा करून करदात्यांची दिशाभूल केल्याचे तपासात समोर आले आहे, असं अधिकाऱ्यांचे म्हणणं आहे.
दरम्यान, याप्रकरणी आयकर विभागाने कडक भूमिका घेतली आहे. विभागाने ज्या कर्मचाऱ्यांनी खोटे दावे केले आहेत त्यांची यादी तयार केली आहे. विभाग या त्यांच्या वरिष्ठांशी संपर्क साधत असून त्यांना त्यांच्या कर्मचाऱ्यांची योग्य माहिती देण्यास सांगत आहे. काही लोक जाणूनबुजून करदात्यांची दिशाभूल करत असल्याचे विभागाचे मत आहे.
दुसरीकडे, करदात्यांना जागरूक करण्यासाठी विभागाने अनेक पावले उचलली आहेत. विभाग नियोक्त्यांसोबत बैठका घेत आहे. या बैठकांमध्ये विभागाचे अधिकारी करदात्यांना आयकर कायद्याची माहिती देत आहेत. चुकीच्या पद्धतीने सवलतीचा दावा केल्याने काय तोटे होऊ शकतात याची माहिती देण्यात येत आहे. तसेच चुकून चुकीचा दावा केला असेल तर तो कसा दुरुस्त करता येईल याचीही माहिती दिली जात आहे.