लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : भारतामधील सर्वाधिक श्रीमंत १ टक्के लोकांच्या संपत्तीत २००० ते २०२३ या कालावधीत तब्बल ६२ टक्क्यांची वाढ झाल्याचे जी-२०च्या अहवालातून समोर आले आहे. हा अहवाल दक्षिण आफ्रिकेच्या अध्यक्षतेखाली तयार करण्यात आला. नोबेल विजेते अर्थशास्त्रज्ञ जोसेफ स्टिग्लिट्झ यांच्या नेतृत्वात झालेल्या अभ्यासात जगभरातील आर्थिक विषमता ‘संकटाच्या’ पातळीवर पोहोचली आहे, असा गंभीर इशारा देण्यात आला आहे. जगभरातील सर्वाधिक श्रीमंत १ टक्के लोकांनी २००० ते २०२४ दरम्यान निर्माण झालेल्या नवीन संपत्तीपैकी ४१ टक्के हिस्सा मिळवला, तर खालच्या ५० टक्के लोकसंख्येला १ टक्का संपत्ती मिळाली.
६२% वाढ भारतातील प्रमुख १% लोकांच्या संपत्तीत २०००–२३ दरम्यान झाली. २.३अब्ज लोक जगात सध्या मध्यम किंवा गंभीर अन्न-संकटाचा सामना करत आहेत. १.३ अब्ज लोक जगात आरोग्य खर्चामुळे गरिबीत आहेत.
उत्पन्न वाढले, मात्र विषमता तीव्र
चीन आणि भारतासारख्या अधिक लोकसंख्या असलेल्या देशांमध्ये गेल्या दोन दशकांत प्रति व्यक्ती उत्पन्नात वाढ झाल्याने देशांमधील असमानता थोडी घटली आहे. मात्र, देशांतर्गत स्तरावरील विषमता तीव्र झाली आहे.
गरिबी कमी होऊ शकते, पण...
योग्य इच्छाशक्ती आणि धोरणात्मक समन्वयाने असमानता कमी करता येऊ शकते. जी-२० यात महत्त्वाची भूमिका बजावू शकते. असमानतेवर लक्ष ठेवण्यासाठी आंतरराष्ट्रीय असमानता समिती’ स्थापन करण्याचा प्रस्तावही अहवालात मांडण्यात आला आहे. ही समिती सरकारांना असमानता कमी करण्यासाठी मदत करेल.
नोबेल विजेत्याच्या अहवालात इशारा
उच्च असमानता असलेल्या देशांत लोकशाहीचा ऱ्हास होण्याची शक्यता सात पट २०२० पासून जागतिक स्तरावर गरिबी कमी होण्याचा वेग थांबला आहे, काही भागांत ती वाढली आहे. २.३ अब्ज लोकांना अन्नसंकटाचा सामना करावा लागत आहे, हा आकडा २०१९च्या तुलनेत ३३.५ कोटींनी अधिक आहे. जगातील अर्धी लोकसंख्या आवश्यक आरोग्यसेवांपासून वंचित आहे, तर १.३ अब्ज लोक आरोग्यखर्चामुळे गरिबीत ढकलले गेले आहेत.
संपत्तीचा हिस्सा वाढवला
या समितीत अर्थतज्ज्ञ जयती घोष, विनी बयानिमांसह इतरांचा समावेश होता. २००० ते २०२३ या कालावधीत सर्वाधिक श्रीमंत १ टक्के लोकांनी जगातील अर्ध्याहून अधिक देशांमध्ये आपला संपत्तीचा हिस्सा वाढवला असून, त्यांचा जागतिक संपत्तीचा वाटा ७४ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.
