ICICI Prudential AMC IPO: देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी ॲसेट मॅनेजमेंट कंपनी असलेल्या आयसीआयसीआय प्रुडेन्शियल एएमसीचा आयपीओ १२ डिसेंबरला उघडणार आहे. कंपनीनं शेअर बाजारात लिस्टिंगची प्रक्रिया जलद करत रजिस्ट्रार ऑफ कंपनीजकडे रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस दाखल केलाय.
आयपीओचा अचूक आकार अद्याप जाहीर झाला नसला तरी, मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनी सुमारे १०,००० कोटी रुपये उभे करू शकते. हा आयपीओ पूर्णपणे ऑफर-फॉर-सेल (OFS) असेल, ज्यात प्रुडेन्शियल कॉर्पोरेशन होल्डिंग्स आपले ४.८९ कोटी इक्विटी शेअर्स (सुमारे ९.९% हिस्सा) विकेल. विशेष बाब म्हणजे, या आयपीओमध्ये आयसीआयसीआय बँकेच्या भागधारकांसाठी २४.४८ लाख शेअर्स राखीव ठेवण्यात आले आहेत. सध्या कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये ₹३५० प्रीमियमवर ट्रेड करत आहेत.
Post Office ची जबरदस्त स्कीम, एकदा पैसे गुंतवा; नंतर व्याजाद्वारेच होईल ५ लाखांची कमाई, जाणून घ्या
आयपीओचे तपशील
आयपीओचा अँकर बुक ११ डिसेंबरला उघडेल, तर पब्लिक इश्यू १२ ते १६ डिसेंबर पर्यंत गुंतवणूकदारांसाठी खुला राहील. शेअर्सचे अलॉटमेंट १७ डिसेंबरला अंतिम होईल. १९ डिसेंबरपासून आयसीआयसीआय प्रुडेन्शियल एएमसीचे शेअर्स बीएसई आणि एनएसईवर लिस्ट होतील. लिस्टिंगनंतर, आयसीआयसीआय समूहाची ही चौथी कंपनी असेल जी बाजारात ट्रेड करेल. यापूर्वी आयसीआयसीआय बँक, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाईफ इन्शुरन्स आणि आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स बाजारात लिस्ट झाले आहेत. कंपनीचे कामकाज १९९८ पासून आयसीआयसीआय बँक आणि यूकेची प्रुडेन्शियल कॉर्पोरेशन होल्डिंग्स यांच्यातील ५१:४९ च्या जॉइंट व्हेंचर म्हणून सुरू आहे.
दुसरी सर्वात मोठी ॲसेट मॅनेजमेंट कंपनी
कंपनीच्या दाव्यानुसार, त्रैमासिक सरासरी एयूएम (AUM) मार्केट शेअर १३.२% सह ती भारतातील दुसरी सर्वात मोठी ॲसेट मॅनेजमेंट कंपनी आहे. आर्थिक वर्ष २०२५ मध्ये कंपनीने २,६५०.७ कोटी रुपयांचा नफा कमावला, जो मागील वर्षापेक्षा सुमारे २९% जास्त आहे. सहा महिन्यांच्या काळात (एप्रिल–सप्टेंबर २०२५) कंपनीचा नफा २१.९% ने वाढून १,६१८ कोटी रुपये झाला, तर महसूल (Revenue) देखील २०% नं वाढून सुमारे २,९४९ कोटी रुपये झाला. सर्वाधिक १४३ म्युच्युअल फंड योजना व्यवस्थापित करणारी ही कंपनी एचडीएफसी एएमसी, निप्पॉन लाईफ इंडिया एएमसी, यूटीआय एएमसी आणि आदित्य बिर्ला सन लाईफ एएमसीशी स्पर्धा करते.
हा मोठा आयपीओ व्यवस्थापित करण्यासाठी १८ मोठ्या मर्चंट बँकांना समाविष्ट केलं आहे, ज्यात सिटीग्रुप, मॉर्गन स्टॅनले, बोफा सिक्युरिटीज, ॲक्सिस कॅपिटल, कोटक महिंद्रा कॅपिटल, एसबीआय कॅपिटल, गोल्डमॅन सॅक्स आणि नोमुरा यांसारख्या नावांचा समावेश आहे.
हा संपूर्ण इश्यू OFS असल्याने, आयपीओमधून जमा होणारी रक्कम कंपनीला मिळणार नाही, तर संपूर्ण रक्कम विक्री करणारी प्रमोटर प्रुडेन्शियल कॉर्पोरेशन होल्डिंग्सला जाईल. वाढता नफा, मजबूत ब्रँड व्हॅल्यू आणि मोठा ग्राहक आधार यामुळे हा आयपीओ बाजारात गुंतवणूकदारांचे चांगले लक्ष वेधून घेऊ शकतो.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
