Google News: गुगलबद्दल माहीत नसेल अशी जगात क्वचितच कोणी व्यक्ती असेल. दरम्यान, गुगलचे सह-संस्थापक सर्गेई ब्रिन यांनी एका जुन्या घटनेचा उल्लेख केला. एक काळ असा होता जेव्हा त्यांना आपण पुढचे 'स्टीव्ह जॉब्स' आहोत असं वाटू लागलं होतं, असं ते म्हणाले. अलीकडेच स्टॅनफोर्डच्या इंजिनिअरिंग स्कूलमध्ये कंपनीच्या सर्वात मोठ्या अपयशी प्रकल्पाचा उल्लेख करताना त्यांनी हे विधान केलं.
गुगल आणि अल्फाबेटचे सह-संस्थापक असलेल्या ब्रिन यांनी 'गुगल ग्लास' प्रकल्पाच्या अपयशावर भाष्य केलं. जेव्हा "माझ्यासारख्या उद्योजक विचारसरणी असलेल्या व्यक्तीनं जुन्या चुका टाळण्यासाठी कोणत्या प्रकारची मानसिकता ठेवली पाहिजे?" असा प्रश्न एका विद्यार्थ्यानं त्यांना केला. तेव्हा ब्रिन यांनी, "जर तुमच्याकडे एखादी उत्कृष्ट ग्लास कल्पना असेल, तर आधी ती व्यवस्थित पूर्ण करा. ती पूर्ण होण्याआधी विनाकारण स्टंट करू नका; हाच सल्ला मी तुम्हाला देऊ इच्छितो," असं म्हटलं.
खिशाला लागणार कात्री! नवीन वर्ष २०२६ मध्ये चांदी ₹३ लाख आणि सोनं ₹१.६० लाखांच्या पार जाणार?
घाई आणि व्यावसायिक दृष्टिकोनातील चूक
आपला अनुभव सांगताना सर्गेई ब्रिन म्हणाले की, मला असं वाटतं की तेव्हा हा प्रॉडक्ट व्यावसायिक स्तरावर आणण्यासाठी (कॉमर्शियलाइज करण्यासाठी) मी खूप घाई केली होती. आम्ही ग्राहकांचा दृष्टिकोन नीट समजून घेतला नाही. जर तो समजून घेतला असता, तर आम्ही हा प्रॉडक्ट अधिक स्वस्त बनवण्याचा प्रयत्न केला असता. ब्रिन पुढे म्हणाले, मी तेव्हा इतका उत्साही आणि आनंदी होतो की मला वाटलं पुढचा स्टीव्ह जॉब्स मीच आहे.
काय होता गुगल ग्लास आणि तो का ठरला अपयशी?
गुगलने २०१३ मध्ये 'गुगल ग्लास' लाँच केला होता. हे ग्लासेस फोनवरील सर्व नोटिफिकेशन्स वापरकर्त्याच्या डोळ्यासमोर प्रोजेक्ट करत असत आणि दिशा दर्शवण्यासही सक्षम होते. परंतु, गुगलच्या इतिहासात हा एक अपयशी प्रकल्प म्हणून गणला जातो, कारण कंपनी याची मोठ्या प्रमाणात विक्री करण्यात अपयशी ठरली. लोकांनी या ग्लासेसचं डिझाइन फारसं पसंत नव्हतं. तसेच, त्यावेळी याची किंमत १५०० डॉलर इतकी महागडी होती. अखेर २०१५ मध्येच गुगलनं हा प्रॉडक्ट बनवणं बंद केलं.
गुगलचं पुनरागमन
या अपयशानंतरही, गुगलने यावर्षी घोषणा केली आहे की ते पुन्हा एकदा स्मार्ट ग्लासेसच्या क्षेत्रात उतरत आहेत. कंपनीनं यावर्षी मे महिन्यात दोन कंपन्यांसोबत भागीदारी केली आहे, ज्याद्वारे या क्षेत्रात नवीन प्रयत्न केले जाणार आहेत.
