UPI Pin Reset: आजच्या डिजिटल युगात युपीआय (UPI) आपल्या दैनंदिन व्यवहारांचा एक अविभाज्य भाग बनला आहे. मोबाईलद्वारे अवघ्या काही सेकंदात पैसे पाठवणं किंवा मिळवणं आता अत्यंत सोपं झालं आहे. ही सुविधा जेवढी सोयीस्कर आहे, तितकीच तिची सुरक्षितता राखणं देखील महत्त्वाचं आहे. आर्थिक सुरक्षिततेसाठी वेळोवेळी UPI PIN बदलणं किंवा अपडेट करणे ही एक चांगली सवय आहे, ज्यामुळे संभाव्य फसवणुकीचा धोका कमी करता येतो.
UPI PIN कसा बदलावा?
जर तुम्हाला तुमचा UPI PIN बदलायचा असेल, तर ही प्रक्रिया अतिशय सोपी आहे. Google Pay, PhonePe, BHIM किंवा Paytm सारख्या बहुतांश UPI अॅप्समध्ये ही पद्धत जवळपास सारखीच असते. PIN बदलण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा.
तुमचं UPI अॅप उघडा आणि प्रोफाइल सेक्शनवर क्लिक करा.
ज्या बँक खात्याचा PIN बदलायचा आहे, ते खातं निवडा.
“Change UPI PIN” या पर्यायावर क्लिक करा.
पहिले जुना UPI PIN टाका आणि त्यानंतर नवीन PIN सेट करा.
प्रोसेस पूर्ण करण्यासाठी OTP किंवा डेबिट कार्डद्वारे ऑथेंटिकेशन करा. यानंतर तुमचा UPI PIN यशस्वीरित्या बदलला जाईल.
UPI PIN कधी आणि का बदलावा?
डिजिटल सुरक्षेसाठी फक्त एकदाच PIN सेट करणं पुरेसं नसतं. सुरक्षिततेच्या दृष्टीनं खालील गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे:
तुमचा UPI PIN नेहमी लक्षात ठेवा आणि सुरक्षित ठेवा.
दर ३ ते ६ महिन्यांनी PIN बदलणं हिताचं असतं.
अत्यंत सोपा किंवा कोणालाही सहज ओळखता येईल असा PIN ठेवू नका.
तुमचा PIN कोणाशीही शेअर करू नका.
जर तुमचा PIN कोणाला समजला आहे असं वाटल्यास, तो त्वरित बदलून घ्या. तसंच कोणत्याही संशयास्पद लिंक किंवा बनावट कॉलपासून सावध राहा.
UPI PIN विसरल्यास तो कसा रिसेट करावा?
जर तुम्ही तुमचा UPI PIN विसरलात, तर काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही काही सोप्या स्टेप्स फॉलो करून तो रिसेट करू शकता:
तुमच्या UPI अॅपमधील 'Bank Account' सेक्शनमध्ये जा.
येथे “Forgot UPI PIN” किंवा “Reset UPI PIN” हा पर्याय निवडा.
तुमच्या लिंक केलेल्या डेबिट कार्डचे शेवटचे ६ अंक आणि एक्सपायरी डेट (MM/YY) एन्टर करा.
बँकेत रजिस्टर असलेल्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल, तो अॅपमध्ये टाका.
आता तुम्ही तुमचा नवीन UPI PIN सेट करू शकता.
लक्षात ठेवा, UPI PIN रीसेट करण्यासाठी तुमचा मोबाईल नंबर बँकेत रजिस्टर असणं आणि डेबिट कार्ड अॅक्टिव्ह असणं आवश्यक आहे. डिजिटल पेमेंट जेवढी सुविधा देते, तेवढीच जबाबदारीही आणतं. त्यामुळे सावधगिरीनं UPI चा वापर करा जेणेकरून तुमचे पैसे आणि माहिती सुरक्षित राहील.
