Financial Planning : श्रीमंत होण्याचे स्वप्न प्रत्येकजण पाहतो, पण त्यासाठी योग्य आर्थिक नियोजन फार कमी लोक करतात. अनेकदा मोठी रक्कम गुंतवणुकीसाठी हवी असते, असा गोड गैरसमज लोकांमध्ये असतो. मात्र, शिस्तबद्ध आणि नियमित गुंतवणुकीच्या जोरावर सामान्य पगारदार व्यक्तीही ३ कोटींहून अधिकचा निधी जमा करू शकते. यासाठी आर्थिक तज्ज्ञांनी '१०X१२X३०' हा एक विशेष 'करोडपती फॉर्म्युला' सुचवला आहे.
नेमका काय आहे '१०X१२X३०' फॉर्म्युला?
हा फॉर्म्युला म्युच्युअल फंडातील एसआयपी गुंतवणुकीवर आधारित आहे. याचे तीन भाग खालीलप्रमाणे काम करतात.
- १० (गुंतवणूक): याचा अर्थ तुम्हाला दरमहा तुमच्या कमाईतून १०,००० रुपयांची बचत करून ती एसआईपीमध्ये गुंतवायची आहे.
- १२ (परतावा): म्युच्युअल फंडामध्ये साधारणपणे १२ ते १८ टक्क्यांपर्यंत परतावा मिळतो. आपण सुरक्षित बाजू म्हणून सरासरी १२% वार्षिक परतावा गृहीत धरूया.
- ३० (कालावधी) : हा फॉर्म्युला यशस्वी करण्यासाठी तुम्हाला ही गुंतवणूक सलग ३० वर्षांसाठी सुरू ठेवावी लागेल.
बघा ३ कोटींचे गणित
समजा तुम्ही वयाच्या ३० व्या वर्षी या गुंतवणुकीला सुरुवात केली आणि वयाच्या ६० व्या वर्षी निवृत्त होणार असाल, तर तुमचे गणित असे असेल.
- दरमहा गुंतवणूक: १०,००० रुपये
- एकूण कालावधी : ३० वर्षे
- एकूण गुंतवलेली रक्कम : ३६,००,००० रुपये (३६ लाख)
- मिळालेला एकूण परतावा : २,७२,०९,७३२ रुपये, एकूण जमा झालेला फंड : ३,०८,०९,७३२ (३ कोटी ८ लाख रुपये)
चक्रवाढ व्याजाची ताकद
या फॉर्म्युल्यामध्ये खरी जादू आहे ती कंपाउंडिंगची. सोप्या भाषेत सांगायचे तर 'व्याजावर मिळणारे व्याज'. तुम्ही दरमहा जी रक्कम गुंतवता, त्यावर मिळणारा परतावा पुन्हा मुद्दलात जमा होतो आणि पुढील महिन्याला त्यावर पुन्हा परतावा मिळतो. तुम्ही जितक्या जास्त कालावधीसाठी गुंतवणूक कराल, तितकाच कंपाउंडिंगचा फायदा अधिक मिळतो.
यशस्वी गुंतवणुकीसाठी 'या' गोष्टी लक्षात ठेवा
- लवकर सुरुवात करा : गुंतवणुकीसाठी योग्य वेळेची वाट पाहू नका. तुम्ही जितक्या लवकर सुरुवात कराल, तितका जास्त कालावधी तुमच्या पैशांना वाढण्यासाठी मिळेल.
- शिस्त आणि संयम : बाजारात चढ-उतार आले तरी एसआयपी बंद करू नका. नियमित गुंतवणुकीमुळेच 'रुपी कॉस्ट एव्हरॅजिंग'चा लाभ मिळतो.
- गुंतवणुकीत वाढ करा : जसा तुमचा पगार वाढेल, तशी गुंतवणुकीची रक्कमही वाढवा. यामुळे तुम्ही ३ कोटींपेक्षाही मोठा फंड सहज उभारू शकता.
वाचा - कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
