Retirement Planning : आर्थिक उद्दिष्टे गाठण्यासाठी केवळ कमावणे पुरेसे नसते, तर योग्य वेळी योग्य ठिकाणी गुंतवणूक करणेही तितकेच महत्त्वाचे असते. जर तुमचे वय आज ३० वर्षे असेल आणि निवृत्तीच्या वेळी, म्हणजेच वयाच्या ५५ व्या वर्षी तुमच्या हातात २ कोटी रुपये असावेत असे तुमचे स्वप्न असेल, तर 'एसआयपी' हा तुमच्यासाठी सर्वात प्रभावी मार्ग ठरू शकतो. शिस्तबद्ध गुंतवणूक आणि चक्रवाढ व्याजाची ताकद यांच्या जोरावर हे उद्दिष्ट सहज गाठता येईल.
एसआयपी म्हणजे काय आणि ती का गरजेची?
सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजेच 'एसआयपी' हा म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याचा एक शिस्तबद्ध मार्ग आहे. तुम्ही दरमहा, दर आठवड्याला किंवा अगदी दररोज ठराविक रक्कम गुंतवू शकता. विशेष म्हणजे, अवघ्या १०० रुपयांपासूनही तुम्ही याची सुरुवात करू शकता. जेव्हा बाजार घसरलेला असतो, तेव्हा तुम्हाला जास्त युनिट्स मिळतात आणि जेव्हा बाजार वधारलेला असतो, तेव्हा कमी. यामुळे तुमच्या गुंतवणुकीची सरासरी किंमत संतुलित राहते, ज्याला 'रुपी कॉस्ट एव्हरेजिंग' म्हणतात.
२ कोटींचे उद्दिष्ट कसे साध्य होईल?
म्युच्युअल फंडमधील परतावा हा बाजाराच्या हालचालीवर अवलंबून असतो. मात्र, दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी सरासरी १२ टक्के वार्षिक परतावा गृहीत धरल्यास २ कोटींचे लक्ष्य सहज गाठता येते. एसआयपी कॅल्क्युलेटरनुसार त्याचे गणित खालीलप्रमाणे आहे.
| तपशील | आकडेवारी |
| तुमचे सध्याचे वय | ३० वर्षे |
| निवृत्तीचे वय | ५५ वर्षे |
| गुंतवणुकीचा कालावधी | २५ वर्षे |
| अपेक्षित वार्षिक परतावा | १२% |
| दरमहा एसआयपी रक्कम | १०,५४० रुपये |
| एकूण गुंतवणूक (२५ वर्षे) | ३१,६२,००० रुपये |
| मिळालेला परतावा (व्याज) | १,६८,३९,०७४ रुपये |
| एकूण मिळणारी रक्कम | २,००,०१,०७४ रुपये |
मजेशीर बाब म्हणजे, तुमची प्रत्यक्ष गुंतवणूक केवळ ३१.६२ लाख रुपये असेल, पण व्याजाच्या स्वरूपामुळे ही रक्कम २ कोटींच्या घरात पोहोचेल. हीच 'कंपाउंडिंग'ची खरी जादू आहे.
गुंतवणुकीपूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
- वैविध्यता : तुम्ही केवळ एकाच फंडमध्ये नव्हे, तर इक्विटी, डेट किंवा हायब्रिड फंडमध्ये एसआयपी करू शकता.
- बाजार चक्र : एसआयपीमुळे तुम्ही बाजारातील तेजी आणि मंदी या दोन्ही स्थितींमध्ये गुंतवणूक करत राहता, ज्यामुळे दीर्घकाळात जोखीम कमी होते.
- सुरुवात लवकर करा : तुम्ही जेवढ्या लवकर गुंतवणूक सुरू कराल, तेवढा मोठा फायदा चक्रवाढ व्याजातून मिळतो.
वाचा - नवीन वर्षात गुंतवणुकीचा श्रीगणेशा! 'या' आहेत श्रीमंत करणाऱ्या टॉप ५ योजना; सुरक्षा आणि दमदार परतावा
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
