Systematic Investment Plan : करोडपती होण्यासाठी खूप मोठा पगार किंवा व्यवसायाची गरज असते, हा समज आता जुना झाला आहे. सामान्य नोकरी करणारी व्यक्तीही शिस्तबद्ध नियोजनाच्या जोरावर करोडपती होऊ शकते. यासाठी 'एसआयपी' हे एक प्रभावी शस्त्र ठरत आहे. दरमहा केवळ ५००० रुपयांची बचत तुम्हाला १ कोटींचा मालक कशी बनवू शकते, याचे सविस्तर विश्लेषण 'एसआयपी कॅल्क्युलेटर'द्वारे समोर आले आहे.
काय सांगते एसआयपीचे गणित?
एसआयपी कॅल्क्युलेटरच्या आकडेवारीनुसार, जर एखादा गुंतवणूकदार दरमहा ५,००० रुपये म्युच्युअल फंडात गुंतवत असेल आणि त्याला वार्षिक सरासरी १२% परतावा मिळाला, तर तो किती वर्षांत करोडपती होईल?
- गुंतवणुकीचा कालावधी : सुमारे २७ वर्षे.
- एकूण गुंतवणूक : १६.२० लाख रुपये.
- मिळणारे व्याज (परतावा) : ९२.५३ लाख रुपये.
- मॅच्युरिटी व्हॅल्यू : अंदाजे १.०८ कोटी रुपये.
कंपाउंडिंगची 'जादू' नक्की काय?
एसआयपीमध्ये सुरुवातीची १०-१२ वर्षे वाढ संथ वाटते. मात्र, खरा चमत्कार शेवटच्या १० वर्षांत घडतो. यालाच 'कंपाउंडिंग' (चक्रवाढ व्याज) म्हणतात. येथे केवळ तुमच्या मुद्दलावरच नाही, तर मिळालेल्या व्याजावरही व्याज मिळते. त्यामुळेच २७ वर्षांत तुमची अवघी १६ लाखांची गुंतवणूक १ कोटींच्या पुढे जाते.
१२% परतावा मिळणे शक्य आहे का?
दीर्घकाळाचा विचार करता अनेक 'इक्विटी म्युच्युअल फंड्स'नी सरासरी ११ ते १३ टक्क्यांपर्यंत परतावा दिला आहे. जरी हा परतावा बाजारातील चढ-उतारांवर अवलंबून असला आणि याची कोणतीही गॅरंटी नसली, तरी जे गुंतवणूकदार मंदीच्या काळातही आपली एसआयपी सुरू ठेवतात, त्यांना दीर्घकाळात सरासरी चांगलाच फायदा मिळतो.
कालावधी कमी करायचा असेल तर काय करावे?
१ कोटींचे लक्ष्य लवकर गाठायचे असल्यास तुमच्याकडे दोन पर्याय आहेत.
- गुंतवणूक वाढवा : जर तुम्ही ५००० ऐवजी ७००० किंवा १०,००० रुपयांची एसआयपी केली, तर तुम्ही २० ते २२ वर्षांतच १ कोटींचा टप्पा गाठू शकता.
- स्टेप-अप एसआयपी : दरवर्षी तुमच्या एसआयपीची रक्कम १० टक्क्यांनी वाढवा, ज्यामुळे उद्दिष्ट खूप लवकर पूर्ण होईल.
वाचा - नव्या वर्षाचा पहिला दिवस 'फ्लॅट'! आयटीसी १० टक्क्यांनी आपटला, पण एनटीपीसी सुसाट
गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाचा सल्ला
करोडपती होण्यासाठी मोठ्या रकमेपेक्षा 'वेळ' आणि 'संयम' अधिक महत्त्वाचे आहेत. तुम्ही जितक्या लवकर गुंतवणूक सुरू कराल, तितका जास्त फायदा कंपाउंडिंगमुळे मिळेल. आजपासून सुरू केलेली ५००० रुपयांची छोटी बचत तुमच्या निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी १ कोटींचा भक्कम आधार ठरू शकते.
