Donald Trump Tariff: २०२५ हे वर्ष संपलं असून यावर्षी अनेक मुद्दे चर्चेत राहिले. मग ते जागतिक तणावाचे असोत किंवा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगातील देशांवर लावलेल्या टॅरिफमुळे निर्माण झालेली ट्रेड वॉरची परिस्थिती असो. 'ट्रम्प टॅरिफ' हा या वर्षातील सर्वात जास्त चर्चेचा विषय ठरला आहे. अमेरिकेच्या टॅरिफ धोरणावर कडक टीकाही झाली, परंतु ट्रम्प यांनी देशाच्या हिताचं असल्याचं सांगत, यामुळे अमेरिकन लोकांसाठी अब्जावधी डॉलर्स येत असल्याचा दावा केला.
इतकंच नाही तर त्यांनी टॅरिफ महसुलातून प्रत्येक अमेरिकन नागरिकाला लाभांश म्हणून २००० डॉलर्स देण्याचं आश्वासनही दिलं होतं. पण तुम्हाला माहिती आहे का की 'ट्रम्प टॅरिफ'मुळे अमेरिकेनं किती कमाई केली आहे? नवीन वर्षात ट्रम्प त्यांचे २००० डॉलर्सचं आश्वासन पूर्ण करतील का? चला समजून घेऊया...
भारताची चीनवर कडी...! 'या' उत्पादनातही मागे टाकलं; ड्रॅगनची चिंता वाढली
ट्रम्प यांची टॅरिफ घोषणा आणि जगात खळबळ
डोनाल्ड ट्रम्प यांनी २ एप्रिल २०२५ पासून भारत, चीन, ब्राझीलसह अनेक देशांवर 'रेसिप्रोकल टॅरिफ' म्हणजेच पारस्परिक शुल्क लावण्याची घोषणा केली होती. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या या टॅरिफ धोरणाचा उद्देश प्रत्यक्षात अमेरिकन उत्पादनांवर इतर देशांनी लावलेल्या उच्च शुल्काच्या बदल्यात समान कर लावणं हा होता आणि त्यांनी याला 'लिबरेशन-डे' म्हटलं होतं. यानंतर काही देशांवरील लागू टॅरिफ कमी करण्यात आलं, तर काहींवर वाढवण्यात आलं. भारतावर तर हे शुल्क दुप्पट करून ५०% करत ब्राझीलच्या श्रेणीत उभं केलं गेलं. दरम्यान, चीनसोबत टॅरिफचा असा खेळ रंगला की जगाची चिंता वाढली आणि ट्रेड वॉरची स्थिती निर्माण झाली होती. मात्र, गेल्या काही दिवसांत ट्रम्प-जिनपिंग भेटीनंतर शांतता दिसून आली आहे.
'जे टॅरिफच्या विरोधात आहेत ते मूर्ख'
केवळ विविध देशांनीच नव्हे, तर विश्लेषकांनीही ट्रम्प यांच्या या रेसिप्रोकल टॅरिफवर जोरदार टीका केली. पण दुसरीकडे अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याला अमेरिकेला अधिक श्रीमंत करण्याचं साधन असल्याचं सांगितलं. टॅरिफचे फायदे सांगताना ट्रम्प म्हणाले होते की, अमेरिकन टॅरिफवर टीका करणारे 'मूर्ख' आहेत. यासोबतच त्यांनी म्हटलं होतं की, हे अमेरिकन शेतकऱ्यांना श्रीमंत करतच आहे. शिवाय ट्रम्प यांनी एका पोस्टद्वारे असंही नमूद केलेलं की टॅरिफमधून येणाऱ्या महसुलातून अमेरिकेला अब्जावधी डॉलर्सचे उत्पन्न मिळत आहे.
ट्रम्प यांनी दिलं होतं मोठं आश्वासन
टॅरिफमधून येणाऱ्या महसुलाचा वापर अमेरिकेवर असलेल्या राष्ट्रीय कर्जाची परतफेड करण्यासाठी केला जाऊ शकतो, जे आता सुमारे ३८ ट्रिलियन डॉलर्स झालंय असंही ट्रम्प यांनी एका पोस्टद्वारे म्हटलं होतं. यासोबतच ट्रम्प यांनी एक मोठी घोषणा करत आश्वासन दिलं होतं की, अमेरिकन टॅरिफ महसुलातून जवळपास सर्व अमेरिकनांना टॅरिफ डिविडंडचा भाग म्हणून २,००० डॉलर्स दिले जातील. मात्र, हे पैसे कसे आणि कधी दिले जातील, हे त्यांनी स्पष्ट केलं नव्हतं.
टॅरिफमधून अमेरिकेची किती कमाई?
डोनाल्ड ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळात विविध देशांवर लावलेल्या अमेरिकन टॅरिफमधून अमेरिकेला आतापर्यंत झालेल्या कमाईबद्दल बोलायचं झालं तर, याची अधिकृत आकडेवारी अद्याप जारी करण्यात आलेली नाही. परंतु, 'यूएस कस्टम्स अँड बॉर्डर प्रोटेक्शन'च्या वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, २०२५ मध्ये १५ डिसेंबरपर्यंत अमेरिकेला टॅरिफमधून २०० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त महसूल प्राप्त झाला आहे. इतर मीडिया रिपोर्टमध्येही या आकड्याच्या आसपास अंदाजित टॅरिफ कमाई सांगितली जात आहे. स्वतंत्र टॅक्स पॉलिसी थिंक टँक 'द टॅक्स फाऊंडेशन'च्या अंदाजानुसार, केवळ ऑक्टोबर २०२५ पर्यंत अमेरिकेने टॅरिफमधून २०५ अब्ज डॉलर्स जमा केले होते. तसंच २०२६ मध्ये ट्रम्प टॅरिफमधून अमेरिकेला २०७.५ अब्ज डॉलर्सचा महसूल मिळण्याची अपेक्षा आहे.
$२०००चं आश्वासन पूर्ण होईल का?
ट्रम्प टॅरिफच्या माध्यमातून मोठा महसूल येत असला तरी, डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रत्येक अमेरिकन नागरिकाला २००० डॉलर्स देण्याच्या आश्वासनात अनेक अडथळे आहेत. ओहायोचे सिनेटर बर्नी मोरेनो यांच्यासह अनेक रिपब्लिकन खासदारांनी या प्रस्तावावर आणि काँग्रेसमध्ये तो मंजूर होण्याच्या शक्यतेवर शंका व्यक्त केली. त्यांचं असंही म्हणणं आहे की, अमेरिकन ट्रम्प हे मिळणाऱ्या महसुलाचा वापर देशाचे प्रचंड कर्ज कमी करण्यासाठी करणं पसंत करतील.
