गेल्या पाच वर्षांपासून चढ्या व्याजदराने कर्जाचे हप्ते भरणाऱ्या करोडो भारतीयांना आज मोठा दिलासा मिळाला आहे. रिझर्व्ह बँकेने आज रेपो रेटमध्ये ०.२५ बेसिस पॉईंटची कपात केली आहे. ईएमआयच्या ओझ्याखाली असलेल्या लोकांना हेही नसे थोडेसे, असे वाटत असणार आहे. कारण कोरोना काळापासून या लोकांनी फक्त ईएमआय वाढलेलाच आकडा पाहिला आहे. तो आता हळू हळू कमी होण्याच्या आशा बळावल्या आहेत.
अशातच कार लोन घेणाऱ्या लोकांच्या देखील आशा पल्लवित झाल्या आहेत. त्यांनाही कर्जाचे हप्ते कमी करण्याचे वेध लागले आहेत. रोपो रेट वाढला की लगेचच तो वाढविणाऱ्या बँका आता व्याजदर कमी करताना उदासिन नाही झाल्या म्हणजे मिळवले.
आता तुम्ही म्हणाल व्याजदर कपात केल्याचा आम्हाला काय फायदा, आम्ही तर आधीच कर्ज घेतले आहे. व्याजदर कपातीचा फायदा अशा लोकांना आहे ज्यांनी कर्ज फिक्स व्याजदरावर नाही तर फ्लोटिंग म्हणजे बदलत्या व्याजदरावर कर्ज घेतलेल्यांना आहे. म्हणजेच कार लोनचे म्हणायचे झाले तर ज्या लोकांनी फ्लोटिंग व्याजदराने कार लोन घेतले आहे त्यांच्या ईएमआयमध्ये घट होणार आहे.
याचबरोबर नवीन कार ज्यांना घ्यायची आहे, त्यांनाही याचा फायदा होणार आहे. महत्वाचे म्हणजे नवीन कार घेणाऱ्यांनी विचार करून कर्जाचा प्रकार हा फिक्स्ड ठेवायचा की फ्लोटिंग हा निर्णय घ्यायचा आहे. महागाई आटोक्यात आणण्यासाठी आरबीआयने व्याजदर वाढविले होते. ते आता कमी केले आहेत. यामुळे भविष्यातही ते कमी कमी होत राहण्याची देखील शक्यता आहे. असे झाल्यास फ्लोटिंग कर्ज फायद्याचे ठरू शकणार आहे.
ज्यांचा फिक्स व्याजदर आहे त्यांचे काय...
ज्यांचा फिक्स व्याजदर आहे, ते बँकेकडे व्याजदर कमी करण्याची मागणी करू शकतात. जर शक्य असेल तर बँक तुमच्या कर्जाचा व्याजदर कमी करू शकते. होम लोनच्या बाबतीत हा मार्ग फायद्याचा ठरू शकतो.