Home Loan: भारतात मध्यमवर्गीयांसाठी घर खरेदी करणे हे केवळ स्वप्नपुर्ती नाही, तर आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. हातात घराच्या चाव्या पडताच मिळणारा आनंद अतुलनीय असतो. परंतु हा आनंद अनेकदा २० वर्षांच्या किंवा त्याहूनही जास्त कालावधीच्या गृहकर्जाच्या जबाबदारीसोबत येतो. या गृहकर्जामुळे दरमहा तुमच्या उत्पन्नाचा मोठा भाग ईएमआयच्या स्वरुपात जातो.
बहुतांश लोक विचार न करता ईएमआय भरत राहतात. त्यांना हे कळत नाही की, सुरुवातीच्या काळात त्यांच्या हप्त्याचा मोठा भाग कर्जाच्या मुद्दलात नाही, तर व्याजात जातोय. परिणामी, कर्जाचा भार वर्षानुवर्षे तसाच राहतो. परंतु जर काही स्मार्ट धोरणे अवलंबून कर्जाचा कालावधी कमी करता येतोच, परंतु व्याजात लाखो रुपये देखील वाचू शकतात.
मॉर्डर इंटेलिजेंसच्या अहवालानुसार, २०२५ ते २०३० दरम्यान भारताचा गृहकर्ज बाजार २२.५% च्या सीएजीआर दराने वाढेल आणि पुढील पाच वर्षांत दुप्पट होऊ शकतो. पण या तेजी असूनही, बहुतांश लोकांना कमी वेळेत आणि कमी खर्चात कर्ज फेडण्याची युक्ती माहित नाही. सेबी-नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार अभिषेक कुमार यांच्या मते, गृहकर्जाचा भार कमी करण्यासाठी आणि ते लवकर पूर्ण करण्यासाठी तीन प्रमुख धोरणे सर्वात प्रभावी आहेत.
१. दरवर्षी एक अतिरिक्त ईएमआय भरणे
अभिषेक सांगतात की, जर तुम्ही २० वर्षांसाठी ८.५% व्याजदराने १ कोटी रुपयांचे कर्ज घेतले, तर तुमचा ईएमआय सुमारे ₹८६,७८२ असेल. परंतु जर तुम्ही दरवर्षी फक्त एक अतिरिक्त ईएमआय भरला, तर तुम्ही सुमारे २० लाख रुपयांचे व्याज वाचवू शकता आणि कर्ज ३ वर्षे ३ महिने आधी पूर्ण करू शकता.
२. कर्जाच्या सुरुवातीला एकरकमी प्रीपेमेंट करणे
जर तुम्ही कर्जाच्या तिसऱ्या वर्षी ५ लाख रुपयांचे प्रीपेमेंट केले, तर सुमारे १४ लाख रुपयांचे व्याज वाचवता येते आणि कर्जाचा कालावधी १ वर्ष १० महिन्यांनी कमी होतो.
३. स्टेप-अप ईएमआय योजना स्वीकारणे
ही सर्वात कार्यक्षम पद्धत आहे. जर तुम्ही दरवर्षी ईएमआय वाढवला, तर कर्ज फक्त ९ वर्षे आणि ८ महिन्यांत पूर्ण होऊ शकते आणि तुम्ही व्याजात सुमारे ५२ लाख रुपये वाचवू शकता.
सुरुवातीला प्रीपेमेंट का आवश्यक आहे?
गृहकर्ज 'रिड्यूसिंग बॅलन्स पद्धती'चा अवलंब करतात. म्हणजेच उर्वरित मुद्दलावर व्याज आकारले जाते. उदाहरणार्थ, पहिल्या महिन्याच्या ८६,७८२ रुपयांच्या ईएमआयमध्ये ७०,८३३ रुपये व्याजात जातात आणि फक्त १५,९४९ रुपये मुद्दलात जातात. कर्जाची थकबाकी कमी होत असताना, व्याज देखील कमी होते.
अभिषेक यांच्या मते, पहिल्या वर्षी १ लाख रुपये प्रीपेमेंट केल्याने १.६१ लाख रुपये व्याज वाचते, परंतु दहाव्या वर्षी तेवढीच रक्कम फक्त ८५,००० रुपये वाचवेल. म्हणून, सुरुवातीला प्रीपेमेंट करणे अधिक फायदेशीर आहे. तसेच, प्रीपेमेंट करताना नेहमी EMI कमी करण्याऐवजी कालावधी कमी करणे निवडा, जेणेकरून अधिक बचत करता येईल.
व्याजदर कमी करण्याची संधी गमावू नका
कर्जाच्या अटींवर लक्ष ठेवा आणि जर दुसरी बँक किंवा NBFC कमी व्याजदर देत असेल, तर बॅलन्स ट्रान्सफर करण्याचा विचार करा. मात्र, यासाठी प्रीपेमेंट दंड किंवा अतिरिक्त शुल्क नाही याची खात्री करा.
(टीप- कुठल्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी किंवा कर्ज घेण्यापूर्वी आर्थिक तज्ञांची मदत घ्या.)