Home Loan vs Rent : प्रत्येक नोकरदार व्यक्तीचं स्वप्न असतं की त्याचं स्वतःचं घर असावं. बऱ्याचदा असं वाटतं की भाड्यावर खर्च करण्याऐवजी तोच पैसा जर गृहकर्जाच्या EMI मध्ये (मासिक हप्ता) वापरला तर आपलं स्वतःचं घर होईल. पण खरंच हे फायदेशीर आहे का? आपण ५० लाख रुपयांच्या घराचं २० वर्षांसाठी आर्थिक विश्लेषण करून पाहूया की भाड्याने राहणं चांगलं की घर खरेदी करणं. म्हणजे तुमच्या मनातील शंका दूर होऊन निर्णय घेण्यास सोपं जाईल.
घर खरेदी करण्याचं गणित
जर तुम्ही ५० लाख रुपयांचं घर घेत असाल, तर तुम्हाला सुमारे २०% रक्कम डाऊन पेमेंट म्हणून द्यावी लागेल. म्हणजेच, १० लाख रुपये
- गृहकर्ज : तुम्हाला ४० लाख रुपयांचं गृहकर्ज घ्यावं लागेल.
- व्याजदर: आपण सरासरी ८.५% व्याजदर गृहीत धरू.
- EMI: २० वर्षांसाठी तुमचा मासिक हप्ता सुमारे ३४,७१३ रुपये असेल.
- एकूण खर्च: २० वर्षांत तुम्ही व्याजापोटी सुमारे ४३.३ लाख रुपये भराल.
- एकूण किंमत: त्यामुळे तुम्हाला घरासाठी एकूण ९३.३ लाख रुपये (१० लाख डाऊन पेमेंट + ४० लाख मूळ रक्कम + ४३.३ लाख व्याज) खर्च करावे लागतील.
- २० वर्षांनंतर जर घराची किंमत वार्षिक ६% दराने वाढली, तर त्याची किंमत १.६० कोटी रुपयांपर्यंत पोहोचू शकते. म्हणजेच, तुम्ही ९३.३ लाख खर्च करून १.६० कोटी रुपयांची मालमत्ता तयार केली.
भाड्याने राहण्याचं गणित
आता जर तुम्ही ५० लाखांच्या घरासाठी भाड्याने राहण्याचा पर्याय निवडला, तर समजा सुरुवातीला तुम्हाला दरमहा २०,००० रुपये भाडे द्यावे लागेल.
भाड्यातील वाढ: दरवर्षी भाड्यात १०% वाढ होत असेल, तर २० वर्षांनंतर तुमचं मासिक भाडं १.३३ लाख रुपयांपर्यंत पोहोचेल.
एकूण खर्च: २० वर्षांत तुम्ही एकूण १.३७ कोटी रुपये फक्त भाड्यावर खर्च कराल, पण तुमच्या हातात कोणतीही मालमत्ता शिल्लक राहणार नाही.
कोणता पर्याय चांगला?
या आकडेवारीनुसार, दीर्घकाळात घर खरेदी करणं जास्त फायदेशीर ठरतं. घर खरेदी केल्यावर २० वर्षांनंतर तुमच्या हातात एक मौल्यवान मालमत्ता असते, तर भाड्याने राहिल्यास तुमच्या हातात काहीच उरत नाही.
पण, हा निर्णय फक्त आकडेवारीवर अवलंबून नाही. तुमच्या नोकरीची स्थिरता, जीवनशैली, आणि तुम्ही किती काळ एकाच ठिकाणी राहणार आहात, हे महत्त्वाचे आहे.
वाचा - १ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
फायदे: भाड्याने राहिल्यामुळे तुम्हाला घर कधीही बदलण्याची मुभा मिळते, ज्यामुळे नोकरी बदलल्यास किंवा स्थलांतर करायचे असल्यास सोपे जाते.
तोटे: मात्र, यात तुमची कोणतीही मालमत्ता तयार होत नाही आणि दरवर्षी भाड्याचा खर्च वाढतच जातो.
शेवटी, गृहकर्ज घेऊन घर घेणं हे एक मोठं आर्थिक पाऊल आहे आणि दोन्ही पर्यायांचे स्वतःचे फायदे आणि तोटे आहेत. तुम्ही तुमच्या वैयक्तिक परिस्थितीनुसार योग्य निर्णय घेऊ शकता.