History of Shalimar Paints : भारतातील पेंट उद्योगात आज एशियन पेंट्स, बर्जर किंवा नेरोलॅक यांसारख्या मोठ्या कंपन्यांचे नाव घेतले जात असले, तरी भारतातील पहिली आणि सर्वात जुनी पेंट कंपनी होण्याचा मान 'शालीमार पेंट्स'कडे जातो. सव्वाशे वर्षांहून अधिक काळाचा गौरवशाली वारसा लाभलेली ही कंपनी आजही भारतीय बाजारपेठेत आपले स्थान टिकवून आहे.
दोन ब्रिटिशांनी हावड्यात रचला पाया
शालीमार पेंट्सचा प्रवास १९०२ मध्ये पश्चिम बंगालमधील हावडा येथून सुरू झाला. ए. एन. टर्नर आणि ए. एन. राईट या दोन ब्रिटीश उद्योजकांनी 'शालीमार पेंट कलर अँड वार्निश कंपनी' नावाने याची सुरुवात केली होती. याच वर्षी कंपनीने हावडा येथे आशियातील सर्वात मोठा मॅन्युफॅक्चरिंग प्लांट उभारला होता, जो दक्षिण-पूर्व आशियातील अशा प्रकारचा पहिलाच प्रकल्प होता.
मालकी हक्क आणि नावातील बदल
१९२८ साली युनायटेड किंगडममधील 'पिंचिन जॉन्सन अँड असोसिएट्स'ने कंपनीचे नियंत्रण आपल्या हातात घेतले. तर १९६३ मध्ये टर्नर मॉरिसन अँड कंपनीने ताबा घेतल्यावर कंपनीचे नाव बदलून 'शालीमार पेंट्स लिमिटेड' असे करण्यात आले. १९७२ साली कंपनी सार्वजनिक झाली आणि भारतीय शेअर बाजारात तिची नोंदणी झाली. ओ. पी. जिंदाल समूहाने १९८९ मध्ये हाँगकाँगस्थित एस. एस. झुनझुनवाला समूहासोबत मिळून ही कंपनी खरेदी केली.
राष्ट्रपती भवन ते फायटर एअरक्राफ्ट
शालीमार पेंट्सने देशातील अनेक प्रतिष्ठित वास्तू आणि ऐतिहासिक स्थळांना आपला रंग दिला आहे.
- राष्ट्रपती भवन
- हावडा ब्रिज
- विद्यासागर सेतू
- सॉल्ट लेक स्टेडियम
विशेष म्हणजे, भारतीय हवाई दलाच्या फायटर एअरक्राफ्टला पेंट करणारी शालीमार पेंट्स ही पहिली भारतीय कंपनी ठरली होती.
वाचा - ईपीएफओ पेन्शनधारकांचे अच्छे दिन! किमान पेन्शनमध्ये ५ पटीने वाढ होण्याची शक्यता
सध्याची स्थिती
मे २०२२ पासून कुलदीप रैना हे कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून धुरा सांभाळत आहेत. आजच्या घडीला बीएसईवर कंपनीचा शेअर ७२.६ रुपयांच्या आसपास व्यवहार करत असून, कंपनीचे बाजार भांडवल ६०८ कोटी रुपये आहे.
