मुंबई - केवळ अदानी उद्योग समूहच हिंडेनबर्ग रिसर्चचे लक्ष्य नव्हते, भारतीय उद्योग क्षेत्राच्या जागतिक स्वप्नावर घाला घालण्याचा त्यांचा प्रयत्न होता, असा आरोप अदानी समूहाचे संस्थापक व अध्यक्ष गौतम अदानी यांनी केला आहे.
कंपनीच्या भागधारकांना लिहिलेल्या पत्रात अदानी यांनी हिंडेनबर्गच्या अहवालावर सविस्तर भूमिका मांडली आहे. त्यात त्यांनी म्हटले की, “२४ जानेवारी २०२३ ही सकाळ भारताच्या भांडवली बाजारासाठी महत्त्वाचा टप्पा ठरली. या दिवशी हिंडेनबर्गन रिसर्चने अदानी समूहाविरुद्ध अहवाल जाहीर करून भारतीय उद्योग क्षेत्रालाच दुर्बळ करण्याचा प्रयत्न केला. तथापि, त्यातून भारतीय उद्योग क्षेत्र अधिक मजबूत झाले. अदानी समूहाची पारदर्शकता, सुशासन आणि शाश्वत विकास यावर ठाम विश्वास व्यक्त करतानाच अदाणी यांनी म्हटले की, सेबीच्या तपासात कथित फसवणूक व शेअर चढ-उताराचे आरोप खोटे ठरले आहेत.
लाटांना घाबरणारी होडी किनारा गाठू शकत नाही
सेबीने समूहास क्लीन चिट दिली आहे. कंपनीवरील आरोपाचे कोणतेही पुरावे नसल्याचे सेबीने स्पष्ट केले. अदानी यांनी समूहावर विश्वास कायम ठेवल्याबद्दल भागधारकांचे आभार मानले आहेत. ‘ही परीक्षा आमच्या पायाभरणीला अधिक बळकट करणारी ठरली,’ असे त्यांनी म्हटले. ‘लाटांना घाबरणारी होडी किनारा गाठू शकत नाही,’ या ओळींनी पत्राचा समारोप करत त्यांनी भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी कार्य करण्याचा दृढ संकल्प व्यक्त केला.