US Former NSA On Donald Trump Tariff: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी भारतावरील टॅरिफ वाढवताच (US Tariff On India), त्यांच्यावर त्यांच्याच देशातून टीका होत आहे. आता अमेरिकेचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (Ex-US NSA) जॉन बोल्टन म्हणाले की, रशियाकडून कच्चं तेल खरेदी केल्याबद्दल भारताला दोष देणं आणि त्यावरील कर २५ टक्क्यांवरून ५० टक्के करणे ही ट्रम्प यांची चूक आहे.
'नोबेल जिंकण्याच्याप्रयत्नाचा एक भाग'
बोल्टन यांनी इंडिया टुडे टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प यांच्यावर जोरदार टीका केली. 'ही डोनाल्ड ट्रम्प यांची चूक आहे आणि ती स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारण्यासारखी आहे. त्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की हा असा निर्णय नाही ज्याला अमेरिकन काँग्रेस किंवा जनतेनं मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला आहे. हा ट्रम्प यांच्या नोबेल शांतता पुरस्कार जिंकण्याच्या प्रयत्नाचा एक भाग आहे,' असं ते म्हणाले. भारतावर ५०% कर लादण्याचा निर्णय ही द्विपक्षीय संबंधांमधील त्यांची चूक असल्याचंही बोल्टन यांनी नमूद केलं.
भारतासोबत डबल गेम खेळतोय चीन? द्विपक्षीय संबंध सुधारत असतानाच केलं 'हे' मोठं काम
ना चीन... ना तुर्की, फक्त भारतच का?
याबद्दल बोलताना जॉन बोल्टन म्हणाले की ट्रम्प यांच्या निर्बंधांची पद्धत भारताला अन्याय्यपणे लक्ष्य करत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी कच्च्या तेलावर अतिरिक्त कर लावण्याच्या थेट धमकीपासून रशिया वाचला आहे. एवढंच नाही तर रशियाकडून मोठ्या प्रमाणात कच्चं तेल खरेदी करणारे चीन किंवा तुर्की किंवा आणखी कोणी त्यांच्यावर यावरुन कोणत्याही प्रकारचे निर्बंध लादलेले नाहीत, तर ट्रम्प यांनी केवळ भारतावर अतिरिक्त कर लादल्याचं ते म्हणाले. दरम्यान, त्यांनी यावरही जोर दिला की रशियन कच्चं तेल-वायू खरेदी करणं ही अशी गोष्ट आहे ज्यापासून भारतानं दूर राहिलं पाहिजे.
जॉन बोल्टन यांच्या मते, ट्रम्प यांचा भारताबद्दलचा अलीकडील दृष्टिकोन अमेरिकेच्या धोरणातील दीर्घकालीन बदल म्हणून पाहू नये. हे लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे की ट्रम्प हे अमेरिकन राजकारणात अपवाद आहेत. राष्ट्राध्यक्षांनी या दृष्टिकोनाचा संबंध आंतरराष्ट्रीय मान्यता मिळविण्याच्या त्यांच्या प्रयत्नांशी जोडला आहे. त्यांना नोबेल शांतता पुरस्कार हवा हे प्रत्येक जण पाहू शकतो. 'ट्रम्प यांना सर्वांना एका करारावर सहमत करून घ्यायचं आहेत, ज्याचे श्रेय ते स्वतः घेऊ शकतात आणि जर हा करार नंतर मोडला तर मला वाटत नाही की ते त्याबद्दल इतके चिंतित होतील, ते नंतर इतरांना दोष देऊ शकतात,' असंही बोल्टन यांनी स्पष्ट केलंय.