एका सरकारी बँक कर्मचाऱ्याने १५ वर्षांच्या सेवेनंतर आपली नोकरी सोडण्याचा वेदनादायक निर्णय ऑनलाइन शेअर केला आहे. त्यांच्या या पोस्टमुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली असून, सरकारी बँकांमधील कर्मचाऱ्यांचं आरोग्य आणि कामाचा वाढता ताण यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
पेन्शनपेक्षा आयुष्य जास्त मौल्यवान
मिंटच्या बातमीनुसार, एका Reddit युजरनं विचारलं की ते त्यांच्या बँक नोकरीतील काम कमी करू शकत नाहीत का? यावर कर्मचाऱ्यानं उत्तर दिले की ते नवीन पेन्शन प्रणालीमध्ये (NPS) आहेत, त्यामुळे त्यांना जुन्या पेन्शनचा लाभ मिळणार नाही. त्यांनी स्पष्ट केलं, "पेन्शन असो वा नसो, मला माझा जीव वाचवायचा आहे. पगारापेक्षा जीवन जास्त मौल्यवान आहे." एका अन्य युजरनं खासगी बँकांमध्येही कामाच्या वाईट परिस्थितीकडे लक्ष वेधले आणि सार्वजनिक क्षेत्रातील नोकरीत टिकून राहणं अधिक चांगलं असल्याचं मत व्यक्त केलं.
नोकरी का सोडली? आरोग्य आणि सन्मान दोन्ही गेले
३९ वर्षीय कर्मचाऱ्याने सांगितलं की, उत्तर भारतात सुरक्षित आणि प्रतिष्ठित मानली जाणारी ही नोकरी त्यांनी तीन अखिल भारतीय स्तरावरील परीक्षा उत्तीर्ण करून मिळवली होती. पण आता हीच नोकरी त्यांना तणावग्रस्त करत आहे. "एका सरकारी बँकेची नोकरी स्थिरता, चांगलं घर, कार आणि समाजात मान-सन्मान देते, पण आता मला ती समाधान देत नाही," असा अनुभव त्यांनी सर्वांसोबत शेअर केला. या नोकरीमुळे त्यांना उच्च रक्तदाब, थायरॉईड आणि फॅटी लिव्हर यांसारख्या गंभीर आरोग्य समस्या जडल्या आहेत. कामाचे सततचे लांबलचक तास (सकाळी १० ते रात्री १० पर्यंत), अचानक बदल्या आणि कधीही न संपणारं सेल्सचं टार्गेट यामुळे आपलं आरोग्य बिघडल्याचं ते म्हणाले.
बॉसची 'अयोग्य मागणी' आणि 'निरुपयोगी विमा' विकण्याचा दबाव
सर्वात जास्त त्रास त्यांना "निरुपयोगी विमा उत्पादनं विकण्याच्या दबावामुळे" झाला. त्यांना ग्राहकांना अशी उत्पादनं विकावी लागत होती, ज्यांची गरज त्या ग्राहकांना स्वतःला नव्हती. एवढंच नाही, तर टार्गेट पूर्ण करण्यासाठी त्यांना रविवारीही काम करावं लागत होतं आणि बॉसच्या 'अयोग्य मागण्यां'समोर गप्प बसावं लागत होतं. "हे असे आहे, जसं तुम्ही तुमचा सन्मान विकला आहे. मला वाटतं की आता मी स्वतःशी न्याय करू शकत नाहीये," असंही त्यांनी नमूद केलं.
अंतिम निर्णय: नोकरी सोडण्याचं धाडस
या परिस्थितीला कंटाळून त्या कर्मचाऱ्यानं आता कामावर जाणं थांबवलं आहे. त्यांनी कबूल केलं की यामुळे त्यांचं वेतन थांबेल आणि आर्थिक अडचणी सुरू होऊ शकतात, परंतु त्यांना आशा आहे की या निर्णयामुळे त्यांना त्यांचं आयुष्य परत मिळेल. "मला भीती वाटते की मी माझ्या इतर सहकारी बँक कर्मचाऱ्यांसारखा एक दिवस कोलमडून पडू नये. मला तसं होऊ द्यायचं नाहीये," असंही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय.
काय म्हणाले नेटकरी
या पोस्टवर अनेक लोकांनी आपली सहानुभूती व्यक्त केली आणि स्वतःचे अनुभव शेअर केले. एका आयटी व्यावसायिकानं त्यांनाही उच्च रक्तदाब आणि फॅटी लिव्हरचा त्रास झाल्याचं म्हटलं. "नोकरी गमावण्याची भीती आणि EMI चा ताण आहे. कधीकधी वाटतं की माझ्याकडे तुमच्यासारखं नोकरीचं संरक्षण असतं आणि माझी बदली एखाद्या दूरच्या भागात झाली असती," असं त्यांनी नमूद केलं. एका अन्य युजरनं लिहिलं की त्यांची बहीण देखील एका सरकारी बँकेत काम करते आणि तिची स्थिती अगदी अशीच आहे. तिला तिच्या चार वर्षांच्या मुलीसाठीही वेळ मिळत नाही. कामाच्या अटी अगदी दयनीय आहेत.