Blinkit : क्विक कॉमर्स क्षेत्रात ब्लिंकिट कंपनी नवनवीन प्रयोग करण्यासाठी प्रसिद्ध आहे. गेल्या वर्षी १० मिनिटांत आयफोन १६ ची डिलिव्हरी करत लाखो ग्राहकांचं लक्ष आकर्षित केलं होतं. ब्लिंकिटने अलीकडे १० मिनिटांत रुग्णवाहिका सेवा सुरू केली आहे. सायबर सिटी गुरुग्राममध्ये पहिल्या ५ रुग्णवाहिका सुरू करण्यात आल्या आहेत. याचं सर्वच स्तरातून स्वागत होत आहे. दरम्यान, ब्लिंकिटने आता एटीएममधून कॅश काढून १० मिनिटांत घरपोच करावी अशी मागणी एका ग्राहकाने केली आहे.
हा ग्राहक सामान्य नसून डॉट आणि यूट्यूब या स्टार्टअप कंपनीचे संस्थापक हर्ष पंजाबी यांनी ही मागणी केली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून हर्ष यांनी ब्लिंकिटचे सीईओ अलबिंदर धिंडसा यांना एटीएमसारखी सेवा सुरू करण्याची विनंती केली आहे.
१० मिनिटांत रोख घरी पोहोचतील
हर्ष यांनी आपल्या अधिकृत एक्स खात्यावरुन ही पोस्ट केली आहे. अलबिंदर यांना टॅग करत हर्षने लिहिलंय, "कृपया, ब्लिंकिटवर एटीएम सारखी सेवा सुरू करा. युजर UPI द्वारे पेमेंट करेल आणि ब्लिंकिट तुम्हाला १० मिनिटांच्या आत रोख हातात आणून देईल. यामुळे खूप मदत होईल.” या पोस्टवर कमेंट करताना हर्षने पुढे लिहिले की, “मी कुठेतरी सहलीला निघालोय आणि माझ्याकडे रोख नाही. घरातही १०० रुपयांच्यावर रोकड नाही. एटीएममध्ये जाण्याचा कंटाळा आलाय. पण, काय करणार जावे लागेल.''
पोस्टवर कमेंट्सचा पाऊस
हर्ष याच्या या पोस्टवर अनेक युजर्सनी मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. एकाने लिहिलंय की तुम्ही १०० रुपये मागवले तर त्यातून १८ टक्के जीएसटी कापून येतील. तर दुसरा म्हणतोय ब्लिंकिटमुळे भारतीय आळशी होत आहे. हर्षच्या पोस्टवर कमेंट करताना एका महिलेने लिहिले की, "स्त्रिया ही योजना आधीपासून वापरत आहेत." ती एका दुकानात जाते आणि बिलापेक्षा जास्त पैसे देते आणि नंतर दुकानदाराकडून रोख रक्कम मागते.
ब्लिंकिटच्या रुग्णवाहिकेत अनेक महत्त्वाची वैशिष्ट्ये
ब्लिंकिटने २ जानेवारी रोजी आपली १० मिनिटांत रुग्णवाहिका सेवा सुरू केली, ज्यामध्ये ऑक्सिजन सिलेंडर, मॉनिटर, स्ट्रेचर व्यतिरिक्त इतर अनेक वैशिष्ट्ये आहेत. रुग्णवाहिका सेवेबाबत अलबिंदर म्हणाले, "ती सुरू करण्यामागे आमचा उद्देश नफा मिळवणे नसून ग्राहकांना परवडणाऱ्या दरात ही सेवा उपलब्ध करून देणे हा आहे."