नवी दिल्ली: केंद्र सरकारने सर्वसामान्यांना महागाईतून दिलासा देण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. जीएसटी परिषदेच्या बैठकीत अनेक वस्तूंवरील जीएसटी दर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय उद्या, २२ सप्टेंबर २०२५ पासून लागू होत आहे. यामुळे दैनंदिन वापरातील अनेक वस्तू स्वस्त होणार आहेत.
लवकरच ऑक्टोबर हिटचा फटका बसणार आहे. यामुळे एसी निर्मात्या कंपन्यांनी जीएसटी कपातीचे सोने करण्याचे ठरविले आहे. व्होल्टास, डायकिन, गोदरेज अप्लायन्सेस, पॅनासोनिक, हायर या कंपन्यांनी २ ते ८ हजार रुपयांपर्यंत एसी, बॉशसारख्या कंपन्यांनी डिशवॉशर व इतर उत्पादनांवरील किंमती कमी केल्या आहेत.
हे आहे मोठे बदल:
सोप, शॅम्पू, टूथपेस्ट: यांसारख्या रोजच्या वापरातील वस्तूंवरील जीएसटी १८% वरून ५% वर आणला आहे.
इलेक्ट्रॉनिक्स आणि घरगुती उपकरणे: एअर कंडीशनर, रेफ्रिजरेटर आणि टीव्ही यांसारख्या वस्तूंचा जीएसटी २८% वरून १८% करण्यात आला आहे.
सिमेंट: घर बांधकामासाठी महत्त्वाच्या असलेल्या सिमेंटवरील जीएसटी २८% वरून १८% पर्यंत कमी करण्यात आला आहे.
औषधे: अनेक जीवनरक्षक औषधे, निदान किट आणि वैद्यकीय उपकरणांवरील जीएसटी दर १२% किंवा १८% वरून कमी करून ५% किंवा ०% करण्यात आला आहे. यामुळे आरोग्य सेवा अधिक परवडणारी होणार आहे.
शिक्षण साहित्य: पेन्सिल, क्रेयॉन, खोडरबर, कंपास पेटी आणि नोटबुक यांसारख्या शालेय वस्तूंवरील जीएसटी दर १२% वरून ५% किंवा ०% पर्यंत कमी करण्यात आला आहे.
ऑटोमोबाईल: ३५० सीसीपेक्षा कमी क्षमतेच्या मोटरसायकल आणि छोट्या कारवरील जीएसटी २८% वरून १८% पर्यंत कमी झाला आहे.
डेअरी आणि पॅकेज्ड फूड: तूप, लोणी, चीज, आणि इतर पॅकेज्ड खाद्यपदार्थांवरील जीएसटी १२% वरून ५% झाला आहे.