शेअर बाजारात नुकतीच धमाकेदार एन्ट्री करणाऱ्या Groww (बिलियनब्रेन्स गॅरेज व्हेंचर्स) या स्टॉकब्रोकिंग प्लॅटफॉर्मच्या शेअर्समध्ये मोठी उलथापालथ झाली आहे. लिस्टिंगनंतर अल्पावधीतच ९० टक्क्यांहून अधिक उसळी घेतलेल्या या शेअरने अचानक ब्रेक घेतला असून, गेल्या दोन दिवसांत गुंतवणूकदारांचे सुमारे १९,००० कोटी रुपयांचे बाजार भांडवल बुडाले आहे.
बुधवारी, १९ नोव्हेंबर रोजी Groww चा शेअर १०% च्या लोअर सर्किटवर स्थिरावला, ज्यामुळे बाजारात खळबळ माजली. लिस्टिंगनंतरची ही पहिलीच मोठी घसरण आहे.
तेजीनंतर नफावसुलीचा तडाखा
या अचानक झालेल्या घसरणीमागे अनेक कारणे आहेत. नफावसुली हे त्यापैकी सर्वात मोठे कारण आहे. शेअरची किंमत ₹१०० वरून ₹१९० च्या आसपास पोहोचल्याने, सुरुवातीच्या गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणावर नफा कमावून शेअर्स विकले. मोठ्या खरेदीनंतर बाजारात शांतता येणे अपेक्षित होते, पण विक्रीचा दबाव प्रचंड वाढला, यामुळे ज्या लोकांनी १८०,१९० किंवा त्या खालोखाल किंमतीत पैसे गुंतविलेले त्यांचे पैसे बुडाले आहेत.
अनेक तज्ज्ञांनी Groww च्या मूल्यांकनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. अँजल वन आणि मोतीलाल ओसवाल सारख्या स्पर्धकांपेक्षा Groww चे P/E गुणोत्तर खूप जास्त होते, ज्यामुळे मूल्यांकनाचे 'करेक्शन' अपरिहार्य होते. बाजारात 'शॉर्ट सेल' (Short Selling) करणाऱ्या अनेकांना Groww चा शेअर मिळेल असे वाटले नव्हते. परिणामी, मोठी संख्या NSE च्या 'ऑक्शन विंडो'मध्ये गेली. हा तांत्रिक दबाव कमी झाल्यानंतर शेअरमध्ये मोठी घसरण झाली.
तिमाही निकालांची प्रतीक्षा
कंपनीचे दुसऱ्या तिमाहीचे आर्थिक निकाल २१ नोव्हेंबर रोजी अपेक्षित आहेत. वास्तविक आकडेवारी येण्यापूर्वीच शेअरने मोठी झेप घेतल्यामुळे, अनेक गुंतवणूकदार निकाल लागेपर्यंत सावध भूमिका घेत आहेत. या घसरणीनंतरही, तज्ज्ञ Groww चा दीर्घकालीन वाढीचा आलेख सकारात्मक मानत आहेत, परंतु सध्याची अस्थिरता कंपनीचे निकाल जाहीर होईपर्यंत कायम राहू शकते.
