Gold Silver Price : गेल्या महिन्याभरापासून सोने-चांदीत मोठ्या प्रमाणात घसरण पाहायला मिळत आहे. आता सरकारने घेतलेल्या एका निर्णयानंतर दागिन्यांच्या बाजारात खळबळ उडाली आहे. देशातील वाढती व्यापारी तूट आणि सोन्याची अनियंत्रित आयात रोखण्यासाठी केंद्र सरकारने आज एक अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. नवीन धोरणानुसार, सोने, प्लॅटिनम आणि त्यांच्याशी संबंधित अनेक उत्पादनांना प्रतिबंधित श्रेणीत टाकण्यात आले आहे. याचा अर्थ असा की, आता या मौल्यवान धातूंची आयात करण्यासाठी सरकारची विशेष मंजुरी आणि परवाना घेणे अनिवार्य असेल.
प्रतिबंधित श्रेणीचा नेमका अर्थ काय?
आतापर्यंत अनेक सोन्या-चांदीच्या वस्तू 'फ्री' श्रेणीत होत्या, म्हणजेच त्यांच्या आयातीवर कोणतेही विशेष निर्बंध नव्हते. मात्र, आता प्रत्येक आयातीसाठी सरकारकडून रीतसर लायसन्स घ्यावे लागेल. हे नियम त्वरित लागू करण्यात आले आहेत. सरकारने स्पष्ट केले आहे की, जुने कॉन्ट्रॅक्ट्स, लेटर ऑफ क्रेडिट किंवा अॅडव्हांस पेमेंट झाले असले तरीही कोणत्याही प्रकारची सवलत दिली जाणार नाही.
कोणत्या वस्तूंवर निर्बंध?
- सोन्याचे तयार दागिने आणि आर्टिकल्स
- प्लॅटिनमचे दागिने आणि आर्टिकल्स
- मौल्यवान धातूंशी संबंधित सुटे भाग
- सोन्याचा मुलामा असलेल्या वस्तू
- लॅब आणि औद्योगिक उत्पादने
- विशेष औद्योगिक साहित्य
सरकारचा यामागचा हेतू काय?
- अधिकृत दस्तऐवजात कारणे स्पष्ट नसली तरी, तज्ज्ञांच्या मते यामागे तीन प्रमुख कारणे आहेत.
- व्यापारी तूट कमी करणे: सोन्याच्या अवाढव्य आयातीमुळे देशाचे परकीय चलन मोठ्या प्रमाणात बाहेर जाते, ते रोखणे.
- स्वदेशी उद्योगांना बळ : स्थानिक ज्वेलरी उद्योगाला संरक्षण देणे.
- अनियमित आयातीवर चाप: छुप्या मार्गाने किंवा नियमांच्या पळवाटा शोधून होणाऱ्या आयातीवर नियंत्रण मिळवणे.
ज्वेलरी क्षेत्रावर आणि तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
१. ज्वेलर्स आणि व्यापारी
आयात प्रक्रिया आता अधिक जटिल आणि वेळखाऊ होणार आहे. पुरवठा कमी झाल्यामुळे उत्पादनाचा खर्च वाढू शकतो, ज्याचा थेट परिणाम दागिन्यांच्या किमतींवर होईल.
२. सामान्य ग्राहक
सोन्या-चांदीचे दागिने महागण्याची शक्यता आहे. स्थानिक बाजारपेठेत सोन्याचे दर जागतिक दरांपेक्षा अधिक राहू शकतात. गुंतवणुकीच्या दृष्टीने सोन्याच्या किमतीत तेजी येण्याचे हे एक संकेत आहेत.
३. औद्योगिक वापरकर्ते
ज्या उद्योगांमध्ये प्लॅटिनम किंवा सोन्याचा कच्चा माल म्हणून वापर होतो, त्यांना आता महागड्या दराने खरेदी करावी लागू शकते.
