Google AI Contract : आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येकाचं कधी ना कधी गुगल सारख्या दिग्गज टेक कंपनीत काम करण्याची इच्छा असते. कारण, गुगलचा गलेलठ्ठ पगार आणि अलिशान सुविधा. गेल्या वर्षभरापासून अनेक कर्मचाऱ्यांना गुगल घरबसल्या मोफत पगार देत आहेत. कंपनी या कर्मचाऱ्यांकडून कोणतेही काम करुन घेत नाही. पण, अट एकच आहे. कंपनी सोडून जायचं नाही. यासाठी कंपनीने कर्मचाऱ्यांसोबत करार देखील केला आहे. अशा परिस्थितीत हे कर्मचारी चिंतेत आहे, असं सांगितलं तर तुमचा विश्वास बसेल का? पण, सत्य आहे. कर्मचाऱ्यांची अडचण दुसरीच आहे.
गुगलने का घेतला निर्णय?
सध्या जगभरातील टेक कंपन्यांमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजेन्स (AI) विकसित करण्यावरुन स्पर्धा लागली आहे. गुगलनेही आपलं जेमिनी प्रॉडक्ट या स्पर्धेत उतरवलं आहे. हे तंत्रज्ञान बाहेर जाऊ नये यासाठी कंपनीने कर्मचाऱ्यांना बसून पगार देण्याचा निर्णय घेतला आहे. बिझनेस इनसाइडरच्या मते, कंपनी जवळजवळ एक वर्षापासून कर्मचाऱ्यांना फुटक पगार देत आहे. हे सर्व कर्मचारी एआयवर काम करणारे आहेत. कारण फक्त एवढेच की हे कर्मचारी इतर कोणत्याही कंपनीत सामील होणार नाहीत. गुगलला सध्या ओपनएआय, मायक्रोसॉफ्टसह अनेक टेक कंपन्यांकडून तगडी स्पर्धा मिळत आहे.
कर्मचाऱ्यांसोबत करार
अहवालांनुसार, गुगलच्या एआय विभाग डीपमाइंडने यूकेमधील काही एआय कर्मचाऱ्यांसाठी नॉनकंपिट करार केला आहे. यानुसार त्यांना एका वर्षासाठी स्पर्धकांसाठी काम करण्यापासून रोखले गेले आहे. कंपनी घरी बसून या कर्मचाऱ्यांना पगार देत आहे, जे एखाद्या मोठ्या सुट्टीसारखे आहे. या करारामुळे गुगल कर्मचाऱ्यांना १२ महिन्यांसाठी इतर कोणत्याही कंपनीत सामील होण्यापासून रोखले जाते. पण, यासाठी गुगला मोठी किंमत मोजावी लागत आहेत.
Dear @GoogDeepMind ers, First, congrats on the new impressive models.
— Nando de Freitas (@NandoDF) March 26, 2025
Every week one of you reaches out to me in despair to ask me how to escape your notice periods and noncompetes. Also asking me for a job because your manager has explained this is the way to get promoted, but…
अमेरिकेत अशा करारांवर बंदी पण...
यूएस फेडरल ट्रेड कमिशनने अशा कोणत्याही करारावर बंदी घातली असली तरी गुगल नॉनकंपिट कराराचा अवलंब करत आहे. अशा करारांमुळे बाजारपेठेतील स्पर्धेवर परिणाम होतो. कामाचे वातावरण देखील बिघडते, असे यूएस फेडरल ट्रेड कमिशनचं म्हणणं आहे. वास्तविक, हा कायदा अमेरिकेत लागू होत असून गुगलचे युनिट लंडनमध्ये आहे. याचा फायदा गुगलने उचलला आहे.
पगार मिळत असूनही कर्मचारी चिंतेत
गुगल घरी बसून त्यांच्या एआय कर्मचाऱ्यांना पगार देत असले तरी, यातील बरेच कर्मचारी या करारातून बाहेर पडू इच्छितात. वर्षभर एआय संशोधनापासून दूर राहिल्यास ते त्यांच्या क्षमता गमावतील, ज्यामुळे भविष्यात नुकसान होईल, अशी चिंता या कर्मचाऱ्यांना सतावत आहे. गुगल, ओपनएआय आणि मायक्रोसॉफ्ट सारख्या कंपन्या त्यांच्या एआय पायाभूत सुविधांवर अब्जावधी डॉलर्स खर्च करत आहेत. अशा परिस्थितीत हे कर्मचारी कामापासून दूर राहिल्यामुळे नवीन तंत्रज्ञान शिकू शकणार नाहीत. याचे परिणाम त्यांना भविष्यात भोगावे लागतील.