US Visa Crisis : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एच-१बी आणि अन्य वर्क व्हिसाबाबत स्वीकारलेल्या कठोर धोरणाचे पडसाद आता उमटू लागले आहेत. दिग्गज टेक कंपनी गुगलने आपल्या विदेशी कर्मचाऱ्यांना, विशेषतः भारतीयांना एक गंभीर इशारा जारी केला आहे. "सध्याच्या परिस्थितीत अमेरिकेबाहेर प्रवास करणे टाळा, कारण एकदा देश सोडला तर व्हिसा प्रक्रियेतील गुंतागुंतीमुळे पुन्हा अमेरिकेत येणे कठीण होऊ शकते," असा सल्ला गुगलच्या इमिग्रेशन वकीलांनी दिला आहे.
'व्हिसा स्टॅम्पिंग'चा मोठा अडथळा
या संपूर्ण समस्येच्या मुळाशी 'व्हिसा स्टॅम्पिंग'ची रखडलेली प्रक्रिया आहे. नियमानुसार, अमेरिकेत काम करणाऱ्या विदेशी प्रोफेशनल्सना देशाबाहेर जाऊन पुन्हा परतण्यासाठी आपल्या मायदेशातील अमेरिकन दूतावासात व्हिसा स्टॅम्पिंग करावे लागते. सध्या भारत आणि इतर देशांमध्ये अमेरिकन दूतावासातील अपॉइंटमेंट मिळणे दुरापास्त झाले आहे. अनेक ठिकाणी हा प्रतीक्षा कालावधी काही आठवडे नाही, तर पूर्ण एक वर्षापर्यंत पोहोचला आहे. पार्श्वभूमी तपासणी आणि अतिरिक्त सुरक्षा निकष कडक केल्यामुळे अर्जांचा मोठा ढीग साचला आहे.
प्रशासनाचा कडक पहारा
ट्रम्प प्रशासनाने राष्ट्रीय सुरक्षेचे कारण देत व्हिसा नूतनीकरणाचे नियम अधिक जाचक केले आहेत. दूतावासांमधील कर्मचाऱ्यांची कमतरता आणि कागदपत्रांची सखोल पडताळणी यामुळे व्हिसा मिळण्यास विलंब होत आहे. यामुळे अमेरिकेत उच्च पदांवर काम करणाऱ्या हजारो भारतीय इंजिनिअर्स आणि आयटी प्रोफेशनल्समध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
वाचा - घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
टेक इंडस्ट्रीमध्ये खळबळ
ही समस्या केवळ गुगलपुरती मर्यादित नसून ॲमेझॉन, मायक्रोसॉफ्ट आणि मेटा (फेसबुक) सारख्या कंपन्यांनाही याचा फटका बसत आहे. अमेरिकेचे तंत्रज्ञान क्षेत्र मोठ्या प्रमाणावर विदेशी गुणवत्तेवर अवलंबून आहे. व्हिसा नियमांमधील ही अनिश्चितता संपूर्ण क्षेत्राच्या उत्पादकतेवर परिणाम करत असून, जागतिक टेक कंपन्या आता आपल्या कर्मचाऱ्यांना प्रवासापासून रोखत आहेत.
