नवी दिल्ली: कामगारांसाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला असून, कर्मचारी भविष्य निधी संघटनेने (ईपीएफओ) सदस्यांना त्यांच्या खात्यातील संपूर्ण म्हणजेच १०० टक्के रक्कम काढण्यास परवानगी दिली आहे. केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 'ईपीएफओ'मधून रक्कम काढण्यासाठी तेरा वेगवेगळे नियम होते. आता हे नियम सोपे करून फक्त तीन प्रकारांत विभागले गेले आहेत.
कशासाठी काढता येणार पैसे? :
गरजांसाठी (आजारपण, शिक्षण, लग्न)। घरासाठी। विशेष कारणांसाठी.
शिक्षण, लग्नासाठी किती वेळा काढाल पैसे ? : शिक्षणासाठी
दहा वेळा व लग्नासाठी पाच वेळा रक्कम काढता येईल. हे दावे लगेच मंजूर केले जातील. आंशिक पैसे काढण्यासाठी आता सेवा कालावधी १२ महिने ठेवला आहे.
घरबसल्या मोफत मिळेल जीवन प्रमाणपत्र
निवृत्त कर्मचाऱ्यांना घरबसल्या डिजिटल जीवन प्रमाणपत्र देता यावे म्हणून 'ईपीएफओ'ने इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेसोबत करार केला आहे.
हे प्रमाणपत्र देण्यासाठी केवळ ५० रुपये शुल्क लागेल, तेही 'ईपीएफओ'च भरेल. त्यामुळे पेन्शनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
कंपन्यांनी उशिरा पैसे भरल्यास...: 'ईपीएफओ'ने 'विश्वास
योजना' नावाची योजना आणली आहे. यात नियोक्त्त्यांनी उशिरा पैसे भरल्यास लागणारा दंड कमी करण्यात आला आहे. आता दंड फक्त एका टक्क्यांपर्यंत मर्यादित असेल.
किती रक्कम खात्यात ठेवावी लागेल? :
प्रत्येक सदस्याने आपल्या खात्यात किमान २५ टक्के रक्कम ठेवणे बंधनकारक असेल, जेणेकरून निवृत्तीच्या वेळी मोठी बचत तयार राहील.