EY Report on Indian Economy: अमेरिकेने लादलेल्या टॅरिफचा भारतीय अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम होणार असल्याच्या चर्चा सुरू असतानाच ईवायच्या रिपोर्टने हुरूप वाढवणारी बातमी दिली आहे. भारतीयअर्थव्यवस्था २०३० च्या अखेरीपर्यंत २०.७ ट्रिलियन डॉलरवर पोहचू शकते. तर २०३८ पर्यंत ३४.२ ट्रिलियन डॉलर जीडीपीसह जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनू शकते, असा अंदाज ईवाय इकॉनॉमी वॉचने व्यक्त केला आहे. पीपीपी विनिमय दराने अर्थात क्रयशक्ती समता सूत्राच्या आधाराने हा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
'ईवाय ईकॉनॉमी वॉच'च्या ऑगस्टच्या अंकात याबद्दलचा रिपोर्ट प्रसिद्ध झाला आहे. जगातील पाच सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये भारतीय अर्थव्यवस्था सातत्याने आणि वेगाने वाढत असलेली अर्थव्यवस्था म्हणून उदयाला आली आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचा आर्थिक पाया भक्कम आहे. यामध्ये उच्च बचत व गुंतवणुकीचे दर, त्याचबरोबर अनुकूल लोकसंख्याशास्त्रीय रचना आणि शाश्वत वित्तीय स्थितीचाही समावेश आहे, असे निरीक्षणे ईवायने आपल्या रिपोर्टमध्ये नोंदवली आहेत.
अनेक आव्हाने, तरीही अर्थव्यवस्था मजबूत
ईवाय इंडियाच्या रिपोर्टमध्ये म्हटलं गेलं आहे की, अनेक आव्हाने उभी राहिलेली असताना भारतीय अर्थव्यवस्थेने जगातील सर्वात पाच मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये स्थान मिळवले आहे. टॅरिफचा दबाव आणि मंदावलेला जागतिक आर्थिक व्यापारासारखी अस्थिर आव्हाने असूनही घरगुती मागणीवर अर्थव्यवस्थेची निर्भरता आणि त्याचबरोबर वाढलेली आधुनिक तंत्रज्ञान क्षमता यामुळे अर्थ व्यवस्थेचा पाया भक्कम आहे.
'ईवाय'ने PPP एक्सचेंज रेटच्या आधारावर हे अंदाज मांडले आहेत. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) आणि जागतिक बँकेसारख्या (World Bank) संस्था देशांच्या अर्थव्यवस्थांची तुलना करण्यासाठी PPP चा वापर करतात.
भारत अमेरिकेला मागे टाकू शकतो
रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, "पीपीपी सूत्राच्या तुलनेनुसार भारतीय अर्थव्यवस्था अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकून दुसऱ्या स्थानी पोहोचू शकते. जर २०३० पर्यंत भारत आणि अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेने अनुक्रमे ६.५ टक्के आणि २.१ टक्के वाढीचा वेग कायम ठेवला, तर २०२८-३० (आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अंदाजानुसार) मध्ये भारतीय अर्थव्यवस्था अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेच्या पुढे जाऊ शकते."
पीपीपी अर्थात क्रयशक्ती समता म्हणजे काय?
क्रयशक्ती समता म्हणजे काय तर दोन वेगवेगळ्या देशांमध्ये एकाच प्रकारची वस्तू आणि सेवा खरेदी करण्यासाठी लागणाऱ्या चलनांच्या प्रमाणाला क्रयशक्ती समता (Purchasing Power Parity - PPP) म्हटलं जातं. हे चलनांच्या विनिमय दराकडे न पाहता, त्या चलनांमध्ये वस्तू विकत घेण्याची ताकद किती आहे, हे मोजले जाते.
उदाहरणाने समजून घ्यायचं झाल्यास, असं समजा की तुम्हाला भारतात एक विशिष्ट वस्तू (कपभर कॉफी) विकत घ्यायची आहे. आता हीच कॉफी अमेरिकेत खरेदी करायची आहे. या कॉफीची भारतात किंमत आहे २०० रुपये, तर अमेरिकेत चार डॉलर.
आता हेच पीपीपीनुसार मोजायचं झाल, तर २०० रुपयाला ४ डॉलरने भागायचे उत्तर आहे ५० रुपये. तर हाच ५० रुपये म्हणजे पीपीपी एक्सचेंज रेट अर्थात विनिमय दर.
सोप्या शब्दात समजून घ्यायचं तर बाजारातील दराप्रमाणे एका डॉलरसाठी ८३ रुपये, असे बघितले तर रुपया कमकुवत आहे. पण, हेच PPP दराप्रमाणे ($1 बरोबर 50 रुपये). म्हणजे अमेरिकेत 1 डॉलरला जी वस्तू विकत घेता येते, तिच वस्तू भारतात खरेदी करण्यासाठी तुम्हाला 83 रुपये नाही, तर फक्त 50 रुपये लागतील.