देशातील ७ कोटींहून अधिक मुलांनी वयाची पाच वर्षे पूर्ण केल्यानंतरही अद्याप आधारमध्ये आवश्यक बायोमेट्रिक अपडेट केलेलं नसल्याची माहिती समोर आलीये. अशा मुलांसाठी, आधार जारी करणारी संस्था, युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) आता देशभरातील शाळांमधून मुलांचे बायोमेट्रिक अपडेट करण्याची प्रक्रिया सुरू करणार आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, हे काम पुढील ४५ ते ६० दिवसांत टप्प्याटप्प्यानं सुरू होईल. ही माहिती UIDAI चे सीईओ भुवनेश कुमार यांनी रविवारी दिली.
शाळाच बनणार आधार अपडेट केंद्र
मिळालेल्या माहितीनुसार, यूआयडीएआय आता एक तंत्रज्ञान विकसित करत आहे ज्याद्वारे पालकांच्या संमतीनं शाळेच्या आवारात मुलांचे बायोमेट्रिक अपडेट केले जाईल. प्राधिकरणसध्या या तंत्रज्ञानाची चाचणी घेत असून येत्या दोन महिन्यांत ते तयार होऊ शकतं. नियमांनुसार ५ ते ७ वर्षे वयोगटातील बायोमेट्रिक अपडेट मोफत आहे, परंतु ७ वर्षांनंतर यासाठी १०० रुपये मोजावे लागतील. ते वेळेत अपडेट न केल्यास आधार क्रमांकही डिअॅक्टिव्हेट होऊ शकतो.
पहिल्या तिमाहीचे निकाल, बोनस आणि डिविडेंडची घोषणा; 'या' बँकेचा शेअर चमकला, तुमच्याकडे आहे?
शाळा प्रवेश व इतर लाभांसाठी आवश्यक
बायोमेट्रिक अपडेट झाल्यानंतर आधार कार्डचा वापर शाळेचा प्रवेश, शिष्यवृत्ती, सरकारी योजना आणि परीक्षा नोंदणी सारख्या सेवांसाठी केला जाऊ शकतो. युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया (यूआयडीएआय) शाळा आणि महाविद्यालयांच्या माध्यमातून वयाची १५ वर्षे पूर्ण झाल्यावर म्हणजेच एमबीयू झाल्यानंतर ही सुविधा दुसऱ्या अनिवार्य बायोमेट्रिक अपडेटपर्यंत वाढवण्याचा विचार करीत आहे.
या प्रकल्पांतर्गत प्राधिकरण प्रत्येक जिल्ह्यात बायोमेट्रिक मशिन पाठवणार असून, ती रोटेशन तत्त्वावर विविध शाळांमध्ये पाठविण्यात येणार आहे, जेणेकरून अधिकाधिक मुलांना या सुविधेचा लाभ घेता येईल. शासनाच्या योजनांचा संपूर्ण लाभ सर्व मुलांना वेळेत मिळावा आणि त्यांच्या ओळखीशी संबंधित प्रक्रिया सुलभ व सुलभ व्हावी, हा प्राधिकरणाचा उद्देश आहे.