लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : चांदीच्या भावातील नवनवीन उच्चांक दररोज गाठले जात असून मंगळवारी (१४ ऑक्टोबर) इतिहासात प्रथमच एकाच दिवसात चांदी १५ हजार रुपयांनी वधारली. या भाव वाढीसह चांदी एक लाख ९५ हजार रुपये किलो अशा विक्रमी भावावर पोहोचली आहे. दुसरीकडे सोन्याच्याही भावात दोन हजार ७०० रुपयांनी वाढ होऊन ते प्रति १० ग्रॅम एक लाख २७ हजार ४०० रुपयांवर पोहोचले आहे.
जगभरात चांदीचा तुटवडा जाणवत असल्याने तिचे भाव दररोज वाढत आहे. या आठवड्यात तर चांदीमध्ये तीन वेळा मोठी भाववाढ नोंदली गेली आहे. पाच दिवसातील अंतराने दोन वेळा ११ हजार रुपयांनी चांदी वधारली हाेती.
वाढत्या मागणीमुळे काही जणांकडून चांदीचा साठा केला जात आहे व वाढीव भावाने त्याची विक्री केली जात आहे. शिवाय चांदी ही जीवनावश्यक वस्तू नसल्याने त्यावर कोणत्याही देशाच्या सरकारचे नियंत्रण नसते. त्यामुळे भाव नियंत्रण करणे शक्य होत नाही. चांदीची दिवसेंदिवस वाढत जाणारी गरज व मागणी यामुळे चांदीचे भाव तर वाढणारच आहे, शिवाय सोनेदेखील तेजीत राहणार आहे.
- अजयकुमार ललवाणी, अध्यक्ष, जळगाव सुवर्ण बाजार असोसिएशन.
सोनेही उच्चांकी पातळीवर
सोमवारी एक लाख २४ हजार ७०० रुपयांवर असलेल्या सोन्याच्या भावात मंगळवारी दोन हजार ७०० रुपयांनी वाढ होऊन ते एक लाख २७ हजार ४०० रुपयांवर पोहोचले. सोने सव्वा लाखाच्या पुढे गेले असून एक तोळे सोन्यासाठी जीएसटीसह एक लाख ३१ हजार २२२ रुपये मोजावे लागतील.