जळगाव/नागपूर : सोने-चांदीच्या भावात वाढ सुरूच असून, जळगावात सोमवारी सोने भावात सकाळी ६०० व संध्याकाळी पुन्हा ८०० रुपयांची वाढ झाली. यामुळे सोने ९७,३०० रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले असून जीएसटीसह १ लाख २१९ रुपये प्रति तोळा झाले. तसेच, चांदीत १२०० रुपयांची वाढ होऊन, ती ९७,५०० रुपये प्रति किलोवर पोहोचली. सकाळी सोने चांदीचे भाव प्रत्येकी ९६,५०० रुपयांवर होते. पावणेपाच वर्षांनतर सोमवारी सकाळी सोने-चांदीचे भाव एकसारखे (सोने प्रति तोळा व चांदी प्रति किलो) झाले होते.
नागपुरातही सोने जीएसटीसह १ लाख ४२५ रुपयांवर (मूळ भाव ९७,५०० रुपये प्रतितोळा) पोहोचले. पहिल्यांदाच चांदीपेक्षा सोन्याचे भाव जास्त झाले. एप्रिल महिन्यात २४ कॅरेट सोन्याच्या भावात तब्बल ६,१०० रुपयांची वाढ झाली. शनिवारच्या ९५,८०० रुपयांच्या तुलनेत सोने १,७०० हजारांनी वाढून ९७,५०० रुपयांवर पोहोचले. तर चांदीही ७०० हजारांनी वाढून ९६,३०० रुपयांच्या तुलनेत भाव ९७ हजारांवर पोहोचले.
२० टक्क्यांहून अधिक परतावा : ट्रम्प इफेक्टमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर सोने आणि चांदीचे दर कमी होतील आणि त्याचा फटका भारताला बसेल, असा तज्ज्ञांनी वर्तवलेला अंदाज अखेर फोल ठरला. यावर्षी ग्राहकांना २० टक्क्यांहून अधिक परतावा मिळाला.