लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : दिवाळी आणि आगामी काळातील लग्नसराईचा हंगाम तोंडावर असतानाच सोन्याच्या किमती दिवसागणिक नवा उच्चांक गाठत असल्या, तरी ग्राहकांच्या सोने खरेदीच्या उत्साहात मात्र तसूभरही फरक पडला नसल्याचे चित्र आहे; मात्र सोने खरेदीच्या पॅटर्नमध्ये बदल होत असून सोन्याच्या दागिन्यांऐवजी ग्राहक आता सोन्याचे बार आणि नाणी यांच्या खरेदीवर भर देत असल्याचे दिसून येत आहे.
मुंबईतील प्रसिद्ध ज्वेलर वृषांक जैन यांनी सांगितले की, केवळ सोनेच नव्हे तर चांदीच्या खरेदीकडेही ग्राहकांचा वाढता कल दिसून येत आहे. ज्या पद्धतीने दिवसागणिक सोने व चांदीच्या किमती वाढत आहेत तो ट्रेण्ड लक्षात घेता आगामी काळात या दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमती आणखी वाढण्याची शक्यता गृहीत धरून अनेक लोक सोने व चांदीच्या खरेदीचे आगाऊ बुकिंग करताना दिसत आहेत. त्यामुळे धनत्रयोदशीच्या दिवशी सोने व चांदी या दोन्ही धातूंच्या खरेदीमध्ये विक्रमी वाढ होण्याचा अंदाज या उद्योगातील व्यापारी व्यक्त करत आहेत. दरम्यान, ‘एमसीएक्स’च्या बाजारात गुरुवारी सोन्याचा प्रति दहा ग्रॅम दर हा १ लाख २८ हजार ३९५ रुपये इतका होता.
का वाढत आहे किंमत?
सोन्याच्या किमती वाढीमागचे विश्लेषण करताना इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनचे प्रवक्ते कुमार जैन यांनी सांगितले की, अमेरिकेकडून सुरू झालेले दर युद्ध, मुद्रांक शुल्कात झालेली वाढ, युक्रेन-रशिया युद्ध, मध्यपूर्वेतील देशातील अशांतता यामुळे सोन्याच्या किमती प्रामुख्याने वाढताना दिसत आहेत.
दिवाळीत २० टन सोने विक्रीचा अंदाज
ज्वेलर्स आनंद पेडणेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत दिवाळीदरम्यान कमीत कमी २० टन सोन्याच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार होतील.
सराफ कुमार जैन यांच्या म्हणण्यानुसार, सोन्याचा भाव प्रतितोळा १ लाख ३० ते १ लाख ३३ हजारदरम्यान आहे. चांदीचा भाव प्रतिकिलो ८५ हजार आहे. दिवाळीदरम्यान सोन्या-चांदीच्या खरेदी-विक्रीचे सुमारे २०० कोटी रुपयांचे व्यवहार होण्याची शक्यता आहे.