मुंबई: सोन्याच्या किमती सध्या सातत्याने नव-नवे उच्चांक गाठताना दिसत आहेत. सध्या सोने ₹१,३०,००० च्या पातळीवर व्यवहार करत आहे. मात्र असे असले तरीही गुंतवणुकीचा ओघ थांबलेला नाही. हे धनत्रयोदशीला झालेली ₹६०,००० कोटींपेक्षाही अधिकच्या विक्रमी विक्रीवरून स्पष्ट होते.
सोन्याच्या गुंतवणुकीने गेल्या ५ वर्षांत गुंतवणूकदारांना तब्बल २०० टक्क्यांपर्यंतचा बंपर परतावा दिला आहे. ऑक्टोबर २०२० मध्ये सोन्याचा दर ४७,००० रुपयांवर होता. जो आज १.३० लाखांवर पोहोचला आहे. तसेच, गेल्या दिवाळीपासून अर्थात एका वर्षात सोन्याने तब्बल ६० टक्क्यांचा परतावा दिला आहे.
₹१.६० लाख प्रति १० ग्रॅमपर्यंत पोहोचू शकतं सोनं -
३१ डिसेंबर २०२४ रोजी २४ कॅरेट सोन्याचा भाव ७६,१६२ रुपये होता, जो आता १,३०,८४० रुपयांवर पोहोचला आहे. अर्थात, चालू वर्षात आतापर्यंत जवळपास ७० टक्के वाढ नोंदवली गेली आहे. तज्ज्ञांच्या मते, पुढील धनत्रयोदशीपर्यंत सोन्याची किंमत ₹१.६० लाख प्रति १० ग्रॅम पर्यंत पोहोचू शकते.
जागतिक स्तरावर, एचएसबीसी (HSBC) आणि बँक ऑफ अमेरिका (Bank of America) यांसारख्या बँकांनी २०२६ पर्यंत सोन्याची टार्गेट प्राइस $५,००० प्रति औंस पर्यंत वाढवली आहे. यानुसार भारतात सोन्याची किंमत ₹१.५० ते ₹१.६० लाख होण्याची शक्यता आहे.
चांदीचा भाव प्रति किलो ₹२.४ लाखपर्यंत जाऊ शकतो -
दरम्यान, ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवालच्या अंदाजानुसार, २०२६ पर्यंत देशात चांदीचा भाव प्रति किलो ₹२.४ लाख (४६% वाढ) पर्यंत जाऊ शकतो, तर जागतिक स्तरावर तो $७५ प्रति औंसवर स्थिरावेल. जागतिक पुरवठ्यातील कमतरता आणि औद्योगिक मागणीतील वाढ, यांमुळे चांदीला बळ मिळत आहे.