मुंबई : काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यानंतर बाजारपेठेतील वातावरण तणावाखाली आहे. भारत-पाकिस्तान संघर्षामुळे कदाचित सोन्याचा भाव प्रति तोळा एक लाख १० हजार रुपयांवर जाईल, असा अंदाज सराफा बाजारातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
भारत-पाकिस्तानातील युद्ध हा जर आणि तरचा प्रश्न आहे. सध्या उभय देशांत घडणाऱ्या घडामोडी, चर्चांवर सगळ्या बाजारपेठांचे लक्ष आहे. या घडामोडींमुळे सोन्याचा बाजार सध्या थंड असला तरी लग्नसराई आणि अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त यामुळे सोन्यामधील गुंतवणूक कमी होणार नाही, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
सोने-चांदीचे सध्याचे दर
चांदी - ९८ हजार रुपये प्रति किलो
सोने ९८ हजार रुपये प्रति तोळा
सराफा बाजारात उलाढाल कमी झाली आहे. ग्राहक जुने सोनेही मोडण्याच्या तयारीत नाहीत. सध्या ग्राहकांचे सोन्याच्या भावाकडे लक्ष आहे. मे महिन्यात होऊ घातलेल्या लग्न समारंभांसाठी अनेक ग्राहकांनी अगोदरच खरेदी केली आहे. भारत व पाकिस्तानमधील चर्चेकडे सर्वांचे लक्ष असून, सोन्याच्या बाजारपेठांमधील उलाढालही यावर अवलंबून आहे.
निर्भय सिंग, सुवर्ण विक्रेते
काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याचा दोन ते तीन दिवस परिणाम झाला होता. आता मार्केट स्थिर होत आहे. प्रति तोळा ९७ हजार किंवा ९८ हजार रुपयांदरम्यान भाव-वर खाली होत आहे. ग्राहकांचा सोनेखरेदीवर भर आहे. लग्नसराई आणि अक्षय तृतीयेचा मुहूर्त यामुळे सोन्यामधील गुंतवणूक कमी होणार नाही.
कुमार जैन, सोने व्यापारी