lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > देशातील सोन्याची आयात वाढली सहा महिन्यांत ३५३ टक्क्यांनी

देशातील सोन्याची आयात वाढली सहा महिन्यांत ३५३ टक्क्यांनी

Gold : केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने नुकतीच सहा महिन्यांची आकडेवारी जाहीर केली. त्यानुसार एप्रिल ते सप्टेंबर, २०२१ या कालावधीमध्ये देशात २४ अब्ज डॉलरचे सोने आयात केले गेले.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2021 06:15 AM2021-10-26T06:15:29+5:302021-10-26T06:15:39+5:30

Gold : केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने नुकतीच सहा महिन्यांची आकडेवारी जाहीर केली. त्यानुसार एप्रिल ते सप्टेंबर, २०२१ या कालावधीमध्ये देशात २४ अब्ज डॉलरचे सोने आयात केले गेले.

Gold imports rise by 353 per cent in six months pds | देशातील सोन्याची आयात वाढली सहा महिन्यांत ३५३ टक्क्यांनी

देशातील सोन्याची आयात वाढली सहा महिन्यांत ३५३ टक्क्यांनी

- प्रसाद गो. जोशी 

नाशिक : चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीमध्ये सोन्याच्या आयातीत ३५३ टक्क्यांनी वाढ झाली असून, चांदीच्या आयातीमध्ये मात्र १५.५ टक्क्यांनी घट झाली आहे. सोन्याच्या आयातीमधील या प्रचंड वाढीमुळे देशाच्या चालू खात्यावरील तोटा हा सप्टेंबरअखेर विक्रमी पातळीवर पोहोचला आहे.

केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने नुकतीच सहा महिन्यांची आकडेवारी जाहीर केली. त्यानुसार एप्रिल ते सप्टेंबर, २०२१ या कालावधीमध्ये देशात २४ अब्ज डॉलरचे सोने आयात केले गेले. मागील वर्षाच्या याच कालावधीमध्ये सोन्याची आयात अवघी  ६.८ अब्ज डॉलरची होती. याचाच अर्थ यंदा सोन्याच्या आयातीमध्ये ३५२.९४ टक्क्यांची वाढ झालेली आहे. 

सणासुदीचा कालावधी तसेच आगामी लग्नसराई यामुळे देशामध्ये सोन्याची मागणी वाढत असून त्यामुळेच आयात वाढत असल्याचे या क्षेत्रामधील जाणकार सांगतात. भारत हा जगातील सर्वात मोठा सोन्याचा आयातदार देश असून दरवर्षी ८०० ते ९०० टन सोन्याची आयात केली जाते. विशेष म्हणजे याच कालावधीमध्ये चांदीची आयात मात्र १५.५ टक्क्यांनी घटली आहे. 

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत ६१.९३ कोटी डॉलरच्या चांदीची आयात झाली. सप्टेंबर महिन्यात  मात्र हीच आयात 
वाढली असून, ती ५५.२३ कोटी डॉलरवर पोहोचली आहे. मागील वर्षाच्या सप्टेंबर महिन्यामध्ये चांदीची आयात ९२.३ लाख डॉलरचीच होती. सोन्याची आयात मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे देशाच्या आयात-निर्यात व्यापाराचा समतोल ढळला आहे. सप्टेंबर महिन्यात व्यापारातील तोटा मोठ्या प्रमाणात वाढून तो २२.६ अब्ज डॉलरवर पोहोचला आहे. हा आतापर्यंतचा सर्वाधिक आकडा आहे.

ईटीएफमध्ये ४४६ कोटींची गुंतवणूक
सप्टेंबर महिन्यामध्ये सोन्याच्या एक्स्चेंज ट्रेडेड फंडामध्ये ४४६ कोटी रुपयांची गुंतवणूक केली गेली आहे. आगामी काळामध्ये सोन्याचे दर वाढते राहण्याची अपेक्षा असल्याने सोन्याच्या ईटीएफमधील गुंतवणूक वाढली आहे. ऑगस्ट महिन्यात सोन्याच्या ईटीएफमध्ये अवघी २४ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती. त्याआधी जुलै महिन्यात तर गुंतवणूकदारांनी ६१.५ कोटी रुपये काढून घेतले होते. सप्टेंबर महिन्यात सोन्याचे दर काहीसे कमी असल्याने गुंतवणूकदारांनी ईटीएफचा पर्याय निवडला असण्याची शक्यता व्यक्त केली गेली आहे. पुढील दोन महिने सोन्याचे दर तेजीतच राहण्याची शक्यता आहे.

Web Title: Gold imports rise by 353 per cent in six months pds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Goldसोनं