लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : वर्ष २०२५ मध्ये सोन्याच्या किमतींनी विक्रमी झेप घेतली आहे. ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’च्या अहवालानुसार, सोन्याने यावर्षी तब्बल ४८ वेळा नवा उच्चांक गाठला असून जागतिक बाजारात साेन्याचा दर प्रति औंस ४,००० डॉलरपेक्षा जास्त झाला आहे. गेल्या ४५ वर्षांतील ही सर्वांत तीव्र वाढ ठरली आहे.
भारतातील सोन्याच्या किमतींमध्ये या वर्षाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत ६६ टक्के वाढ झाली. जागतिक स्तरावरील वाढ ५८ टक्के इतकी राहिली. डॉलरच्या तुलनेत रुपया कमजोर झाल्याने भारतातील दर अधिक चढले असून, सोने आता प्रति १० ग्रॅम १,२०,००० रुपयांपेक्षा अधिक दराने विकले जात आहे.
भूराजकीय तणाव, अमेरिकी फेडरल बँकेकडून व्याजदर कपातीची अपेक्षा आणि सुरक्षित गुंतवणुकीचा कल या घटकांमुळे सोन्याचा दर सातत्याने वाढत आहे. भाव वाढले तरी भारतीय ग्राहकांचे सोने प्रेम कमी झालेले नाही. गुंतवणूक व सणासुदीच्या अलंकार खरेदीमुळे बाजारात पुन्हा तेजी आली आहे. मोठ्या ज्वेलरी स्टोअर्सच्या विक्री व महसूल ६.५ टक्के ते ६३ टक्के वाढला आहे.
छोट्या ज्वेलर्सना फटका?
स्वतंत्र छोट्या ज्वेलर्सच्या ग्राहकांत मात्र चढ्या किमतीमुळे घट जाणवली. हलक्या डिझाइन्स, जुन्या सोन्याच्या बदल्यात नवे सोने देणे आणि डिजिटल सवलती यांमुळे विक्रीला चालना मिळाली.
गोल्ड ईटीएफमध्ये सप्टेंबरमध्ये विक्रमी ८३.६ अब्ज रुपयांची गुंतवणूक झाली. व्यवस्थापनाधीन मालमत्ता ९०१ अब्ज रुपयांवर पोहोचल्या. भारताची सोने आयात सप्टेंबरमध्ये १० महिन्यांतील उच्चांकांवर जाऊन ९.१६ अब्ज डॉलर झाली. आरबीआयने आपला सोन्याचा साठा ०.२ टनांनी वाढवून ८८० टनांवर नेला.
घटलेली महागाई (१.५४ टक्के), जीएसटी कपात व लग्न सराईतील वाढलेली मागणी यामुळे सोन्याची चमक या वर्षाअखेपर्यंत टिकून राहील, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे.
तीव्र वाढीपासून सावध राहा
गेल्या वर्षभरात सोने व चांदीच्या किमतींनी मोठी झेप घेतली असली तरी संपत्ती व्यवस्थापकांनी गुंतवणूकदारांना सावध राहण्याचा सल्ला दिला आहे.
जाणकारांच्या मते, सोन्या-चांदीचा सध्याचा तेजीचा टप्पा तांत्रिकदृष्ट्या उच्च स्तरावर पोहोचला आहे आणि आता खरेदीसाठी योग्य काळ नाही. सध्या दीर्घकालीन गुंतवणूक धोरणावर भर देणे आणि संयम ठेवणे अधिक योग्य ठरेल.
‘आनंद राठी वेल्थ’चे संयुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी फिरोज अजीज यांनी सांगितले की, ‘अलीकडील वाढीमुळे अनेक गुंतवणूकदार ‘रेसेंसी बायस’च्या (ताज्या घडामोडी) प्रभावाखाली चुकीचे निर्णय घेत आहेत. बहुतेक लोक खरेदी अपेक्षित असतानाच्या वेळी विक्री करतात.