ज्वेलर्स आणि स्टॉकिस्ट्स यांच्या जोरदार विक्रीमुळे, शुक्रवारी राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील सराफा बाजारात सोने 1,400 रुपयांनी घसरून 80,000 रुपयांच्या खाली गेले. तर चांदीच्या दरात 4200 रुपयांची घसरण नोंदवण्यात आली. अशी माहिती ऑल इंडिया बुलियन असोसिएशनने दिली आहे. याशिवाय, आंतरराष्ट्रीय बाजारातील कमकुवत ट्रेंडमुळेही सराफांच्या किमतीवरही प्रचंड दबाव राहिला.
चांदीमध्ये डिसेंबर महिन्यातील सर्वात मोठी घसरण -
99.9 टक्के शुद्धतेच्या सोन्याचा भाव 1400 रुपयांनी घसरून 79,500 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आला. गेल्या सत्रात तो 80,900 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता. तर चांदी 4,200 रुपयांनी घसरून 92,800 रुपये प्रतिकिलोवर आली. डिसेंबर महिन्यातील ही सर्वात मोठी घसरण आहे.
गुरुवारी शेवटच्या व्यवहारात चांदी 97,000 रुपये प्रति किलोवर बंद झाली होती. 99.5 टक्के शुद्धतेच्या सोन्याचा भावही 1400 रुपयांनी घसरून 79,100 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आला आहे. आदल्या दिवशी याची किंमत 80,500 रुपये प्रति 10 ग्रॅम होती.
कॉमेक्समध्ये सोन्याचा दर घसरून 2670 डॉलरवर -
एलकेपी सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष (संशोधन विश्लेषक) जतिन त्रिवेदी म्हणाले की, यूएसमधील उत्पादक मूल्य निर्देशांक (पीपीआय) मध्ये घसरण आणि साप्ताहिक बेरोजगारीच्या दाव्यांमधील वाढीनंतर, नफा-वसुलीमुळे सोन्याची मोठी विक्री दिसून आली. यामुळे कॉमेक्समध्ये (कमोडिटी मार्केट) सोन्याची किंमत 2670 डॉलर प्रति 10 ग्रॅमवर आली आहे. कॉमेक्स सोन्याचा वायदा प्रति औंस 18.60 डॉलरने घसरून 2,690.80 प्रति औंस डॉलरवर आला आहे. तर चांदी 1.42 टक्क्यांनी घसरून 31.17 डॉलर प्रति औंसवर आली आहे.