Gold Price: भारताच्या वायदा बाजारात बुधवारी सोनं आणि चांदीच्या किमती मोठ्या प्रमाणावर घसरल्या. सोन्याचे दर लाइफटाइम हायपासून तब्बल 12,000 रुपयांनी घसरले, तर चांदीचे दर 26,500 रुपयांनी खाली आले. ही घसरण या वर्षातील सर्वात मोठी मानली जात आहे.
सहा मिनिटांत 7,700 रुपयांची घसरण
बुधवारी सायंकाळी 5 वाजता मल्टी कमोडिटी एक्स्चेंज (MCX) वर बाजार सुरू झाल्यानंतर केवळ सहा मिनिटांतच सोन्याच्या किंमतींमध्ये जवळपास 6%, म्हणजेच 7,700 रुपयांची घसरण झाली. तज्ज्ञांच्या मते, ही घसरण भू-राजकीय तणाव आणि आणि गुंतवणूकदारांच्या नफावसुलीमुळे झाली आहे.
सोन्याच्या किमती आता 1.20 लाख रुपयांच्या स्तरावर आल्या असून, एक दिवस आधी त्या 1,28,271 रुपये प्रति 10 ग्रॅम होत्या. म्हणजेच केवळ एका दिवसात सोनं 7,696 रुपयांचा तोटा खाली आलं.
सोन्याचे उच्चांकी दर आणि...
गेल्या शुक्रवारी सोनं 1,32,294 रुपये प्रति 10 ग्रॅम या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचलं होतं. आता हे दर त्या तुलनेत जवळपास 9%, म्हणजेच 12,000 रुपयांनी कमी झाले आहेत. ही या वर्षातील सर्वात मोठी घसरण मानली जात आहे.
चांदीलाही घसरणीचा फटका
फक्त सोनंच नव्हे तर चांदीतही मोठी घसरण दिसून आली. बुधवारी चांदी 6,508 रुपयांनी घसरली आणि 1,43,819 रुपये प्रति किलो या स्तरावर आली. मंगळवारी ती 1,50,327 रुपये होती. लाइफटाइम हायच्या तुलनेत (1,70,415 रुपये प्रति किलो) चांदीत 26,596 रुपयांची, म्हणजेच 16% घट झाली आहे.
तज्ज्ञांचा अंदाज
IIFL Wealth Management चे डायरेक्टर अनुज गुप्ता यांच्या मते, “सोनं अजून 10,000 रुपयांपर्यंत स्वस्त होऊ शकतं. भू-राजकीय तणाव कमी होत असल्यानं आणि अमेरिका-चीन व्यापारयुद्ध शमल्यानं सेफ हॅवन मागणी घटेल.” त्यांच्या मते, सोनं 1.10 लाख ते 1.15 लाख रुपये प्रति 10 ग्रॅम या दरम्यान येण्याची शक्यता आहे.