भारतीय सराफा बाजारात आज मंगळवारी (१६ डिसेंबर) सोन्याच्या दरात मोठी घसरण बघायला मिळाली. कालच्या तुलनेत आज २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम तब्बल १३०६ रुपयांनी कमी झाला आहे. Ibjarates च्या आकडेवारीनुसार, आज दुपारी २४ कॅरेट सोन्याचा भाव ₹१,३२,१३६ प्रति १० ग्रॅमवर आला आहे. यापूर्वी, काल हाच भाव ₹१,३३,४४२ प्रति १० ग्रॅम होता.
चांदीच्या दरातही घसरण -
सोन्याप्रमाणेच चांदीच्या दरातही आज घट दिसून आली. आज चांदी ₹१,९१,९७१ किलोवर आहे. काल चांदी ₹१,९२,२२२ प्रति किलोग्रॅम होती. अर्थात, आज चांदी ₹२२५ रु ने स्वस्त झाली आहे. यापूर्वी, शुक्रवारी सायंकाळी चांदीचा ₹१,९५,१८० प्रति किलोवर पोहोचली होती. मात्र, यानंतर चांदीच्या दरात घसरण दिसून आली. महत्वाचे म्हणजे, औद्योगिक मागणीमुळे चांदीचा दर नजीकच्या काळात २ लाख रुपयांचा टप्पा पार करू शकतो, असे बाजारातील तज्ज्ञांचे मत आहे.
कॅरेटनुसार असे आहेत सोन्याचे दर -
- आज २३ कॅरेट सोन्याचा दर ₹१,३१,६०७ प्रति १० ग्रॅम एवढा आहे.
- आज २२ कॅरेट सोन्याचा दर ₹१,२१,०३७ प्रति १० ग्रॅम एवढा आहे.
- आज १८ कॅरेट सोन्याचा दर ₹९९,१०२ प्रति १० ग्रॅम एवढा आहे.
- आज १४ कॅरेट सोन्याचा दर ₹७७,३०० प्रति १० ग्रॅम एवढा आहे.
सोन्याच्या किंमतीसंदर्भात बोलायचे झाल्यास, बऱ्याच दिवसांनंतर शुक्रवारी सोन्याच्या दराने ₹१.३० लाखांचा टप्पा पार केला आहे. सोमवारी सोन्याच्या किंमतीने ₹१.३३ लाखांचा टप्पा ओलांडला होता. परंतु आज झालेल्या मोठ्या घसरणीमुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.
